सोशल मिडीयाच्या माध्यमातून पुन्हा सलमान खानला धमकी
धमकीचा व्हिडीओ अपलोड करणार्या आरोपीस राजस्थानातून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जून २०२४
मुंबई, – सोशल मिडीयाच्या माध्यातून पुन्हा एकदा दबंग सिनेअभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत गुन्हा दाखल होताच सोशल मिडीयावर धमकीचा व्हिडीओ अपलोड करणार्या बनवारीलाल गुजर नावाच्या एका मुख्य आरोपीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अरे छोडो यार या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बनवारीलालने सोशल मिडीयावर धमकीचे दहाहून अधिक व्हिडीओ अपलोड करताना स्वतला गॅगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा खास सहकारी असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्याच्या अटकेने या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
१४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोरच लॉरेन्स आणि अनमोल बिष्णोईच्या इशार्यावरुन दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच त्याचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात करुन सुरत, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब येथून सहा आरोपींना अटक केली होती. या आरोपींमध्ये हरपाल सिंग, मोहम्मद रफिक चौधरी, विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल, अनुजकुमार ओमप्रकाश थापन आणि सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याचा समावेश होता. त्यापैकी अनुजकुमार थापन याने पोलीस कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. उर्वरित पाचही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या पाचही आरोपींचा गोळीबारात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले आहेत. त्यात गुन्ह्यांत वापरलेल्या बाईकसह पिस्तूल, काडतुसे, मॅगझीनसह इतर वस्तूचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत अलीकडेच सलमान खानसह त्याचा भाऊ अरबाज खान याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.
या घडामोडी सुरु असताना सलमानच्या एका मित्राला सोशल मिडीयावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ दिसला होता. अरे छोडो यार या यूट्यूब चॅनेलवर एका व्यक्तीने सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार त्याने सलमानला सांगितला होता. त्यानंतर त्याने दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी करत होते. या पथकाने आरोपीची माहिती काढून राजस्थान येथील बोर्डा गावातून बनवारीलाल गुजर या संशयिताला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी राजस्थान येथून मुंबईत पुढील चौकशीसाठी आणण्यात आले होते.
याच गुन्ह्यांत स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बनवारीलालने आतापर्यंत सोशल मिडीयावर दहाहून अधिक व्हिडीओ अपलोड केले असून त्यात त्याने सलमानला धमकी देताना त्याला कशा प्रकारे मारले जाऊ शकते याबाबत खुलासा केला आहे. गावात दहशत निर्माण होण्यासाठी त्यानेच ही धमकी देताना तो बिष्णोईचा खास सहकारी असल्याचे सांगत होता. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून त्यात काही आक्षेपार्ह नोंदी दिसून आल्या आहेत. हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणा आहे. त्यातून डिलीट झालेला डाटा मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. हा डाटा मिळाल्यास अनेक गोष्टींचा पर्दाफाश होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.