मतमोजणी केंद्रात विनापरवानगी प्रवेश करणे महागात पडले
आमदार विलास पोतनीससह अंगरक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – उत्तर-पश्चिम लोकसभा निवडणुकीनंतर गोरेगाव येथील नेस्को मतमोजणी केंद्रावर विनापरवागी प्रवेश करणे शिवेसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विधान परिषदेचे आमदार विलास पोतनीस यांना चांगलेच महागात पडले आहे. मतमोजणी केंद्रावर अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी त्यांच्यासह त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचार्याविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलीकडेच नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडिलकर व निवडणुक अधिकारी दिनेश गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आता वनराई पोलीस ठाण्यात दुसर्या गुन्ह्यांची भर पडली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकर आणि अमोल किर्तीकर यांच्यात थेट लढत झाली होती. या दोघांनी एकमेकांना चांगलीच टक्कर दिली होती. मतमोजणीनंतर अमोल किर्तीकर यांना दोन वेळा विजयी घोषित करण्यात आले होते, मात्र नंतर रविंद्र वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मतदान केंद्रावर झालेल्या गोंधळामुळे तेथील वातावरण तंग झाले होते. त्यातच रविंद्र वायकर यांचा मेहुणा मंगेश पंडिलकर आणि निवडणुक अधिकारी दिनेश गुरव यांच्याविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गोरेगाव येथील नेस्को मतमोजणी केंद्रावर मंगेश पंडिलकर हे मोबाईल घेऊन आले होते, तिथे मोबाईल आणण्यास सक्त मनाई असताना त्यांना मोबाईल घेऊन जाण्यास दिनेश गुरव यांनी परवानगी दिली होती. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. या घटनेला आता काही तास उलटत नाही तोवर आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्यासह त्यांचा अंगरक्षक पोलीस कर्मचार्यावर मतमोजणी केंद्रावर विनापरवागी प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी नंदकिशोर देशमुख यांच्या लक्षात येताच त्यांच्या वतीने वनराई पोलिसांत तक्रार कण्यात आली होती. या तक्रारीनंतर विलास पोतनीसह दोघांविरुद्ध १८८, १२८ (२) भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रावर प्रवेश करण्यासाठी तिथे उपस्थित निवडणुक अधिकार्यांची परवानगी घेणे आवश्यक होते, मात्र तशी कुठलीही परवानगी न घेता विलास पोतनीस हे त्यांच्या अंगरक्षक पोलिसासह आले होते. त्यांनी मतमोजणी केद्रात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा आरोप आहे.