चेहरा ओळख प्रणालीने चोरटा झाला गजाआड
१९ जून २०२४
मुंबई, – रेल्वेत आणि प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला बोरिवली रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उस्मान शेख असे त्याचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी स्थानकात लावलेल्या चेहरा ओळख प्रणालीने शेखला तुरुंगाची हवा खावी लागली. शेखचा १५ वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्या अपघातात त्याचा एक हात आणि पाय निकामी झाला होता.
तक्रारदार हे नालासोपारा येथे राहतात. ते गोरेगाव येथे एका कंपनीत काम करतात. मे महिन्यात ते गोरेगाव स्थानकात ट्रेनची वाट पाहत होते. वाट पाहत असताना त्याना झोप लागली. झोपेतून जागे झाल्यावर त्याचा मोबाईल खिशात नव्हता. मोबाईल चोरी प्रकरणी त्याने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक दत्ता कुपेकर यांच्या पथकातील उप निरीक्षक साळुंखे आदी पथकाने तपास सुरु केला. तपासा दरम्यान पोलिसांनी स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रेल्वे सुरक्षा बलाने आरोपीचा फोटो चेहरा ओळख प्रणाली मध्ये अपलोड केला. त्यानंतर मालाड स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
तपासणी केली असता चेहरा ओळख प्रणालीने एक अलर्ट जारी केला. अलर्ट जारी केल्यानंतर मालाड स्थानकात कर्तव्यास असलेल्या आरपीएफच्या जवानाने शेखला ताब्यात घेऊन बोरिवली रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरीच्या गुन्ह्यात त्याला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. शेख हा मुंबई सेंट्रल पूर्वच्या मराठा मंदिर परिसरात राहतो. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. लोकल मधून प्रवास करणारे प्रवासी किंवा फलाटावर झोपलेल्या प्रवाशाच्या बाजूला जाऊन तो बसतो. संधी मिळताच तो प्रवाशांचे साहित्य चोरून पळ काढतो अशी त्याची गुन्ह्याची पद्धत होती.