दरोड्यापूर्वीच तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना घातक शस्त्रांसह अटक
दिडोंशी पोलिसांची कारवाई; तिघांविरुद अनेक गंभीर गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जून २०२४
मुंबई, – गोरेगाव येथील ओम सत्यम सुपर मार्केटमध्ये दरोड्यासाठी आलेल्या तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दरोड्यापूर्वीच दिडोंशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. मोहम्मद अली रफिक अन्सारी, सलमान मोहम्मद रफिक अन्सारी आणि नफीस मोहम्मद चौधरी ऊर्फ चपटा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही गोरेगावच्या जी वॉर्ड, बीएमसी कॉलनीतील रहिवाशी आहेत. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोरेगाव येथील साईबाबा कॉम्प्लेक्स, साई मिनार इमारतीच्या सी विंगमध्ये ओम सत्यम सुपर मार्केट नावाचे एक दुकान आहे. या दुकानात रात्रीच्या वेळेस दरोड्याच्या उद्देशाने काहीजण येणार असल्याची माहिती दिडोंशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे आधीपासून साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा तिथे सहा तरुण आले होते, त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता सहापैकी तिघांना शिताफीने ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दोन लोखंडी कटावणी, दोन सुरा, तलवार, मिरचीची पूड आदी मुद्देमाल सापडला. चौकशीत ते तिघेही तिथे दरोड्याच्या उद्देशाने आल्याचे उघडकीस आले. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यातील मोहम्मद अलीविरुद्ध सात, सलमान मोहम्मदविरुद्ध आठ तर नफीसविरुद्ध तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या तिघांनाही शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईदरम्यान त्यांचे तीन सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.