दोन घटनेत जन्मदात्या पित्याकडून तीन मुलींचा लैगिंक अत्याचार
विनयभंगासह लैगिंक अत्याचारप्रकरणी दोन्ही आरोपी पित्यांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जून २०२४
मुंबई, – शहरात दोन घटनेत जन्मदात्या पित्यानेच त्यांच्या तीन अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन विनयभंग तसेच लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. याप्रकरणी पार्कसाईट आणि ना. म जोशी मार्ग पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन दोन्ही आरोपी पित्यांना अटक केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील ३५ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती आणि बारा वर्षांच्या मुलीसोबत विक्रोळी परिसरात राहत असून ती घरकाम करते. अनेकदा ती कामावर जाताना तिची मुलगी एकटीच घरी राहत होती. ही संधी साधून तिचे वडिल तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होते. जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा विनयभंग केला होता. ती तिच्या भावासोबत झोपलेली असताना तो तिला भावाच्या शेजारी झोपू नकोस, त्याच्या शेजारी झोपण्यास प्रवृत्त करत होता. रात्रीच्या वेळेस तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजला होता. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने तिच्यासोबत पार्कसाईट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी मुलीच्या पित्याविरुद्ध ३७६, ३७६ (२), (एफ), ३७६ (ए), (बी), ३५४, ३५४ (अ) भादवी सहकलम ६, १०, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पार्कसाईट आणि घाटकोपर पोलीस ठाण्यात मारामारीसह शिवीगाळ करणे, घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरी घटना आग्रीपाडा परिसरात घडली. याच परिसरात राहणार्या एका ४१ वर्षांच्या व्यक्तीने त्याच्याच दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. ९ जून ते १६ जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला होता. वडिलांकडून सुरु असलेल्या या लैगिंक अत्याचाराला कंटाळून एका मुलीने हा प्रकार आग्रीपाडा पोलिसांना सांगून तिच्या वडिलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी पित्याविरुद्ध ३५४, ३५४ अ भादवी सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर ना. म जोशी मार्ग पोलिसाकडे वर्ग करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. जन्मदात्या पित्यानेच त्यांच्या तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करुन त्यांच्याशी लैगिंक अत्याचार केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.