गोरेगाव येथे डॉक्टरची तर कांदिवलीत तरुणाची आत्महत्या

एकाने गळफास घेतला तर दुसर्‍या इमारतीवरुन उडी घेतली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – गोरेगाव येथे डॉ. रवी यादव या ४९ वर्षांच्या डॉक्टरने आपल्या फॅमिली मित्राच्या राहत्या घरातील बेडरुममध्ये गळफास तर कांदिवलीत प्रथम कृष्णा नाईक या १९ वर्षांच्या तरुणाने त्याच्या राहत्या निवासी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी गोरेगाव आणि कांदिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद केली असून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिली घटना गोरेगाव येथील तीनडोंगरी, म्हाडा वसाहतीत घडली. या वसाहतीत तक्रारदार राहत असून रवी यादव हे त्यांचे फॅमिली मित्र आहेत. सिपला कंपनीत वैद्यकीय अधिकारी म्हणून कामाला असलेले रवी हे डोबिवली येथे त्यांच्या कुटुंबियांना राहत होते. सोमवारी २४ जूनला ते डोबिवलीतील राहत्या घरातून गोरेगाव येथे राहणार्‍या फॅमिली मित्राकडे आले होते. रात्री साडेदहा वाजता ते त्यांच्या बेडरुममध्ये गेले आणि तिथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार नंतर उघडकीस येताच या मित्राने गोरेगाव पोलिसांना ही माहिती दिली. त्यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रवी यादव हे काही दिवसांपासून मानसिक तणावात होते, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांनी दुजोरा दिला आहे.

दुसरी घटना कांदिवलीतील लालजीपाडा, गणेशनगरातील रिहा अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटमध्ये कृष्णा नाईक हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. प्रथम हा त्यांचा मुलगा असून तीन दिवसांपूर्वीच तो इन्फिनिटी मॉलच्या एका पिझा शॉपमध्ये नोकरीला लागला होता. तीन दिवस काम केल्यानंतर तो सोमवारी गेला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलानी त्याला विचारणा केली होती. त्यानंतर तो कामावर जातो असे सांगून घरातून निघून गेला, मात्र कामावर न जाता तो डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनजवळ बसला होता. काही वेळानंतर त्याच्या वडिलांना पिझा शॉपमधून कॉल आला होता, यावेळी एका कर्मचार्‍याने प्रथम कामावर आला नाही असे सांगितले. त्यामुळे ते प्रथमला पाहण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी त्यांना प्रथम हा डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनजवळ सापडला. त्यांनी त्याची समजूत काढून त्याला घरी आणले. काही वेळानंतर तो इमारतीच्या २३ व्या मजल्यावर गेला आणि त्याने इमारतीच्या डक येथून उडी घेतली होती. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. कामावर का जात नाही अशी विचारणा केल्यामुळे प्रथमने आत्महत्या केल्याचे बोलले जाते, मात्र या आत्महत्येमागे अन्य काही कारण आहे का याचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांनी सांगितले. दरम्यान या दोन्ही घटनेनंतर कांदिवली आणि गोरेगाव पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page