मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जून २०२४
मुंबई, – घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन एका पाच वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ३१ वर्षांच्या वडापाव विक्रेत्याला खेरवाडी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
२४ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत वांद्रे परिसरात राहते. तिचा दुसरा विवाह झाला असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुले आहे. पिडीत पाच वर्षांची मुलगी तिच्या पतीपासून झाली आहे. ती तिच्या पतीसोबत हाऊसकिपिंगचे काम करते. ती तिच्या कुटुंबियांसोबत पोटमाळ्यावर तर आरोपी हा तिच्या घरातील तळमजल्यावर राहतो. मंगळवारी २५ जूनला ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली होती. यावेळी तिच्या घरात कोणीही नव्हते. ही संधी साधून आरोपीने तिच्या पाच वर्षांच्या मुलीला त्याच्या घरी आणले. तिच्याशी अश्लील चाळे करुन त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिला मारहाण करुन हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र गुरुवारी २७ जूनला तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. तिच्याकडून मिळालेल्या माहितीने तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने खेरवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३७६ (अ), ३७६ (ब), ३२३, ५०६ भादवी सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. आरोपीचा वडापाव विक्रीचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.