बँकेत तारण ठेवलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार

१.१० कोटींना गंडा घालणार्‍या चौकडीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जुलै २०२४
मुंबई, – बँकेत तारण ठेवलेल्या फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्‍याकडून फ्लॅटसाठी घेतलेल्या एक कोटी दहा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी एका चौकडीविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कश्यप मेहता, अतुल शामजी भरानी, अशोक शामजी भरानी आणि आशित चंद्रकांत बदानी अशी या चौघांची नावे असून ते चौघेही शिवडीतील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कटातील कश्यप हा मुख्य आरोपी असून त्यानेच त्याचा फ्लॅट बँकेत तारण ठेवून फ्लॅटचा व्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

चिराग नरेंद्र कामदार हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत माटुंगा येथील अरोरा सिनेमागृहाजवळील आंबेडकर रोड परिसरात राहतात. सात वर्षांपूर्वी त्यांची कश्यप मेहतासह भरानी कुटुंबियांशी ओळख झाली होती. त्यांची सनशाईन इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी असून या कंपनीत ते संचालक म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीने वडाळा येथील सुमनताई म्हात्रे मार्गावर सनशाईन हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या एका इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. या चौघांनीही त्यांना या इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले होते. या फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांनीही तिथे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर एक फ्लॅट बुक केला होता. या फ्लॅटबाबत त्यांच्यात कायदेशीर करार झाला होता. या करारानंतर चिराग कामदार यांनी चारही आरोपींना २५ लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांनी एका खाजगी बँकेतून गृहकर्ज घेऊन उर्वरित ८५ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या कंपनीच्या खात्यात जमा केला होता. अशा प्रकारे त्यांनी फ्लॅटसाठी त्यांना एक कोटी दहा लाख रुपयांचे पेमेंट केले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्यांनी फ्लॅट खरेदी-विक्रीचा करार रद्द करुन त्यांच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी त्यांचे पैसेही परत केले नाही. काही दिवसांनंतर त्यांना त्यांच्यातील व्यवहार सुरु असताना कश्यप मेहता, अतुल भरानी, अशोक भरानी यांनी या फ्लॅटची परस्पर एस. क्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा कर्मचारी आशित बदानी याला विक्री केल्याचे समजले होते. हा प्लॅट त्याने बँकेत तारण म्हणून ठेवले होते. तारण असलेल्या फ्लॅटची खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांनी चिराग कामदार यांच्याकडून १ कोटी १० हजाराचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसात चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कश्यप मेहतासह इतर तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ४०९, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या चौघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page