पगाराच्या वादातून कंपनीसह वरिष्ठ अधिकार्‍यांची बदनामी

कंपनीच्या माजी सीटीओ अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जुलै २०२४
मुंबई, – पगाराच्या वादातून एका माजी अधिकार्‍यानेच त्याच्या कंपनीसह सीईओ व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांची ई-मेलमधील गोपनीय माहिती गैरमार्गाने मिळवून त्यांची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार फोर्ट परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरुन विकी ऍन्थोनी रॉड्रिक्स या कंपनीच्या माजी सीटीओ अधिकार्‍याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजीव शिरीष देसाई हे अंधेरीतील आझाद रोड परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. फोर्ट येथील चरणजीत राय मार्ग, फोर्ब्ज इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. याच कंपनीत त्यांच्यासोबत विकी रॉड्रिक्स हा सीटीओ म्हणून काम करत होता. ७ ऑगस्ट २०१८ ते ३० जून २०२४ या कालावधीत त्याने आपल्या पदाचा गैरवापर करुन कंपनीच्या सीईओ, सीएफओ, सीबीओ, सीएमओ, अध्यक्ष, आयटी, मार्केटिंग आणि एचआर विभागाचे प्रमुख, कंपनीचे कायदेशीर सल्लागारासह इतर तेराहून अधिक पदाधिकार्‍यांचे अधिकृत ईमेल आयडीचे राऊटिंग रुल्स कंपनीच्या नकळत बनविले होते. पगार वाढीच्या वादातून त्याने जुलै २०१८ ते मार्च २०२३ या कालावधीत दुसर्‍या बोगस ई-मेल आयडीवर कंपनीच्या संबंधित अधिकार्‍यांच्या ई-मेल आयडीवरील गोपनीय माहिती आणि डेटा गैरमार्गाने प्राप्त केला. या माहितीच्या आधारे त्यांनी कंपनीसह संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांची सोशल मिडीयावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार अलीकडेच या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे कंपनीच्या वतीने राजीव देसाई यांनी आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कंपनीचा माजी अधिकारी विकी रॉड्रिक्स याच्याविरुद्ध ४२० भादवी सहकलम ६६, ६६ डी, ७२ अ, आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून लवकरच विकीची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहै. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page