घातक शस्त्रांची विक्रीप्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

आठ विदेशी पिस्तूल व १३८ जिवंत काडतुसांचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जुलै २०२४
मुंबई, – घातक शस्त्रांची विक्री करणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या युनिटच्या नऊच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मिठालाल गुलाब चौधरी, दवल चंद्रप्पा देवरमनी ऊर्फ धवल ऊर्फ अनिल आणि पुष्पक जगदीश मांडवी अशी या तिघांची नावे असून यातील मिठालाल हा उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरचा तर धवल आणि पुष्पक हे नवी मुर्ंबतील ऐरोली व घनसोलीचे रहिवाशी आहेत. या तिघांकडून पोलिसांनी आठ विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि १३९ जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने सोमवार ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रविवारी ३० जूनला जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, दिपक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, श्रीराम घोडके, पोलीस उपनिरीक्षक सुीजत म्हैसधुने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पालकर, संतोष काकडे, पोलीस हवालदार सुभाष शिंदे, सुनिल म्हाळसंक, जितेंद्र शिंदे, भिकाजी खडपकर, दुष्यंत कोळी, दत्तात्रय कोळी, सचिन राऊत, संतोष लोखंडे, राहुल पवार, विनय चौगुले, प्रशांत भूमकर, अमोल सोनावणे, शार्दुल बनसोडे, राकेश कदम, गितेश कदम, सुशांत गवते, पोलीस हवालदार चालक विनायक परब, अविनाश झोडगे, शशिकांत निकम, महिला पोलीस शिपाई साधना सावंत, प्राजक्ता धुमाळ यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.

ठरल्याप्रमाणे रविवारी जुहू येथील म्हाडा कॉलनी, साईनाथ नगर, गुरुनानक रोडजवळील पीव्हीआर सिनेमागृहासमोर मिठालाल चौधरी आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे स्टेनलेस स्टिलचे पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे सापडले. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता तो इतर राज्यातून पिस्तूल आणून मुंबईसह आसपासच्या परिसरात विक्री करत होता. याकामी त्याला धवल हा मदत करत होता तर काही पिस्तूल त्याने पुष्पक मांडवी याला विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने नवी मुंबईतून धवल आणि पुष्पक या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलिसांनी सात विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि १३१ जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे. या तिघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंतच्या चौकशी मिठालाल हा उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर, चुनारच्या भुईज खासचा रहिवाशी असून तोच इतर शहरातून घातक शस्त्रे आणून त्याची विक्री करत होता. २०१० पासून तो क्षेत्रात कार्यरत असून या कालावधीत त्याने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरात शस्त्रांची विक्री केली आहे. त्याच्याविरुद्ध उत्तरप्रदेशात चार गुुन्ह्यांची नोंद आहे. पुष्पक आणि धवल हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनुक्रमे दोन आणि एक गुन्ह्यांची नोंद आहे. घातक शस्त्रांची विक्री करणारी ही एक आंतरराज्य टोळी असून या टोळीने आतापर्यंत कोणाला घातक शस्त्रांची विक्री केली आहे, या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला आहे का किंवा कोणार होता याचा पोलीस तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page