धमक्यांना कंटाळून ४८ वर्षांच्या रिक्षाचालकाची आत्महत्या
गोरेगाव-राममंदिर स्थानकादरम्यान लोकलखाली येऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जुलै २०२४
मुंबई, – मानसिक शोषण करुन सतत जिवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून मोहम्मद अजीज गुलाम मोहम्मद शेख या ४८ वर्षांच्या रिक्षाचालकाने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानसिक नैराश्यात आलेल्या मोहम्मद अजीजने गोरेगाव-राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलखाली येऊन जीवन संपविले. याप्रकरणी मानसिक शोषणासह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी उमेश राठोड आणि गुड्डू अशी या दोघांविरुद्ध बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद शफी गुलाम मोहम्मद शेख हा गोरेगाव येथील एम. जी रोड, मोतीलाल नगर क्रमांक तीन, आझादनगरचा रहिवाशी असून तिथेच तो त्याच्या पत्नी, दोन मुले, भाऊ मोहम्मद अजीज आणि मोहम्मद नसीर, दोन बहिणींसोबत राहतो. त्याचा स्टेनशरी स्टिकरचा व्यवसाय आहे. मंगळवारी २ जुलैला त्यांच्या घरी गोरगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस आले होते, त्यांनी त्यांचा भाऊ मोहम्मद अजीजचा पॅनकार्ड दाखवून त्याचा रेल्वे अपघात झाला आहे. त्यामुळे त्यांना बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले होते. त्यामुळे ते बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांना मोहम्मद अजीजने गोरेगाव आणि राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान चर्चगेटकडे जाणार्या धिम्या गतीच्या लोकलखाली आत्महत्या केल्याचे समजले होते. त्याच्याकडे पोलिसांना पॅनकार्ड, कॅब चालविण्याचे ओळखपत्र आणि एक चिठ्ठी सापडली होती. या चिठ्ठीतील हस्ताक्षर मोहम्मद अजीजचे होते. त्यात त्याने त्याचे नाव मोहम्मद अजीज असून त्याला वारंवार जिवे मारण्याची धमकी येत आहे. ही धमकी त्याला उमेश राठोड व त्याचा सहकारी गुड्डू देत आहेत. या दोघांनी यापूर्वी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात गंभीररीत्या जखमी झाल्याने मी ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. त्यानंतरही ते दोघेही मला जिवे मारण्याची धमकी देत होते. मी रिक्षा चालविणारा गरीब माणूस असून उमेश आणि गुड्डूच्या जिवे मारण्याच्या धमक्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडले होते.त्यामुळे त्यांच्या धमक्यांना कंटाळून मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येनंतर संबंधित दोन्ही आरोपीविरुद्ध कारवाई करुन मला न्याय द्यावा असे नमूद केले आहे. या प्रकारानंतर मोहम्मद शफी यांना प्रचंड धक्का बसला होता.
चौकशीदरम्यान मोहम्मद अजीज हा रिक्षाचालक असून तो मंगळवारी दुपारी घरातून राममंदिर रेल्वे स्थानकात आला होता. त्यानंतर त्याने गोरेगाव आणि राममंदिर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलखाली आत्महत्या केली होती. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांवरुन त्याची ओळख पटली होती. हा प्रकार उघडकस येताच मोहम्मद शफी यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी उमेश राठोड आणि गुड्डू यांच्याविरुद्ध मोहम्मद अजीजचा मानसिक छळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच उमेश आणि गुड्डूला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात ते तिघेही एकमेकांचे परिचित असून चांगले मित्र आहे. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, मात्र हा वाद त्यांनी आपसांत मिटविला होता. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा मैत्रीचे वातावरण होते. तरीही त्याने सुसायट नोटमध्ये त्यांच्या नावाचा का उल्लेख केला याचा उलघडा होऊ शकला नाही. या दोघांचीही रेल्वे पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून या जबानीत त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. मोहम्मद अजीज आत्महत्या करेल असे आपण कोणतेही कृत्य केले नसल्याचा दावाच त्यांनी पोलिसांकडे केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.