बोगस दागिन्यांवर लोन घेऊन बँकेची १.३८ कोटीची फसवणुक
दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या खातेदाराला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जुलै २०२४
मुंबई, – बोगस दागिन्यांवर १ कोटी ३८ लाख रुपयांचे गोल्ड लोन घेऊन बँक ऑफ इंडियाची फसवणुक केल्याप्रकरणी गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका खातेदाराला अखेर बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. गौतम छन्ना राठोड असे या आरोपी खातेदाराचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत यापूर्वीही काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील तक्रारदार महिला मालाड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मुख्य प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. बँकेने त्यांच्या खातेदारासह विविध आकर्षक आणि कमी व्याजदरात लोन योजना सुरु केली होती. या योजनांना सर्वच खातेदारांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यात काही लोकांनी गोल्ड तारण ठेवून बँकेतून कर्ज घेतले होते. गोल्ड घेताना खातेदारांनी बँकेत तारण ठेवलेले सोन्याची शुद्धता पडताळणीसाठी बहुचार इंटरप्रायजेसची मालकीण सपना भट्ट हिची बँकेने नियुक्ती केली होती. २९ ऑक्टोंबर २०१८ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीत तिने सोने तपासून प्रमाणपत्र दिलेल्या काही खातेदारांना बँकेने गोल्ड लोन मंजूर केले होते. मात्र या खातेदारांनी त्यांच्या गोल्ड लोनवरील मुद्दल आणि व्याजाची रक्कम बँकेत जमा केली होती. त्यापैकी चौदा खातेदारांना नोटीस बजावून पंधरा दिवसांत संपूर्ण गोल्ड लोनची रक्कम भरा नाहीतर त्यांच्या गोल्डची विक्री करुन लोनची रक्कम वसुली केली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र नोटीस बजावून संबंधित खातेदारांकडून कोणताही प्रतिसाद आला नव्हता. त्यामुळे बँकेच्या वतीने तारण ठेवलेल्या गोल्डच्या फेरमूल्यांकन करण्यात आले होते. त्यात चौदा खातेदारांनी दिलेले गोल्ड बोगस होते. ते गोल्ड बोगस असल्याचे माहित असताना सपना भट्ट हिने गोल्ड खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणुक केली होती.
हा प्रकार निदर्शनास येताच बॅकेच्या वतीने या महिला प्रबंधकाने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अलिफिया विक्रांत राठोड, यश जगदीशभाई पारेख, राहुल क्रिष्णकुमार अग्रवाल, देवयानी क्रिष्णकुमार अग्रवाल, गौतम छन्ना राठोड, विक्रांत आर राठोड, हितेंद्रभाई राजगोर, रिना कमलेश प्रिट्रोडा, राजमती भावनाथ यादव, अरुण दत्तात्रय लाड, दिलीप धनसिंग ठाकूर, सागर हितेंद्रभाई राजगौर, महेश एस. राणा, मीना महेश राणा आणि सपना कुमार भट्ट अशी या पंधराजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. चौकशीत या चौदा खातेदारांनी बोगस गोल्ड देऊन बँकेकडून १ कोटी ३८ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणुक केली होती. गुन्हा दाखल होताच काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर इतर आरोपींचा शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या गौतम राठोड याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.