मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ जुलै २०२४
मुंबई, – अपहरण करुन २१ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच प्रियकराने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अपहरणासह लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आसाद शेख या २४ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास साकिनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
२१ वर्षांची पिडीत मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत कुर्ला येथे राहते. तिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून ती सध्या घरी राहते. चार महिन्यांपूर्वी तिची सोशल मिडीयावर आसादशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली झाली होती. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते. एप्रिल २०२४ रोजी ती त्याला भेटण्यासाठी साकिनाका येथे आली होती. यावेळी तो तिला साकिनाका, जरीमरीजवळील सफेदपुलाजवळ घेऊन आला होता. तिथे त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने त्याला विरोध केला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिला बेदम मारहाण करुन तिच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबला होता. हा प्रकार एका नागरिकाच्या निदर्शनास येताच ते दोघेही निघून गेले होते. त्यानंतर त्याने तिला फिनिक्स मॉलजवळ सोडले. हा प्रकार कोणालाही सांगितला तर बघून घेण्याची धमकी त्याने तिला दिली होती. या संपूर्ण प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर आसाद तिला सतत कॉल करत होता. मात्र तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. ११ जूनला ती तिच्या मित्रांसोबत फिनिक्स मॉलजवळील एटीएम सेंटरसमोरुन जात होती. यावेळी तिथे आसाद आला आणि त्याने तिचा मोबाईल घेतला. मोबाईल घेण्यासाठी ती त्याच्या मागे गेली. यावेळी जरीमरीजवळील एका पार्क केलेल्या टेम्पोमध्ये त्याने तिला बसण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिने विरोध केल्यानंतर त्याने पुन्हा तिला बेदम मारहाण केली होती. तिचे डोके टेम्पोवर जोरात आपटले. त्यामुळे तिला दुखापत झाली होती. या घटनेनंतर तो तिला भाभा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथे प्राथमिक औषधोपचार करुन तिला सोडून देण्यात आले. त्यानंतर तो तिला पुन्हा जरीमरी येथे घेऊन गेला. आसाद झोपल्यानंतर ती मोबाईन न घेता निघून गेली होती. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला.
२७ जूनला ती तिच्या मैत्रिणीसोबत गोवंडी येथे गेली होती. सायंकाळी घरी आल्यानंतर तिला पुन्हा आसाद भेटला. त्याने तिला टेम्पोतून वसई येथे आणले. तिथे त्याने तिच्यावर पुन्हा लैगिंक अत्याचार केला. तसेच त्याच्याशी संबंध तोडल्यास जिवाचे बरे-वाईट करुन घेईल अशी धमकी दिली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न गेल्याने तिच्या आईने घाटकोपर पोलिसात तिची मिसिंग तक्रार केली होती. ५ जुलैला आसाद तिला घेऊन मालाची डिलीव्हरीसाठी कुर्ला बस डेपोजवळ आला होता. यावेळी तिथे घाटकोपर पोलीस आले आणि त्यांनी आसादसह तिला पोलीस ठाण्यात आणले होते. पोलीस ठाण्यात तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून आसादविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह लैगिंक अत्याचार, जिवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा अंधेरी येथे घडल्याने त्याचा तपास साकिनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.