सिक्रेट ऑफ गावस्कर वेबसिरीज प्रदर्शित करुन निर्मात्याची फसवणुक

८२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी कंपनीच्या मालकाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ जुलै २०२४
मुंबई, – सिक्रेट ऑफ गावस्कर ही वेबसिरीज व्हिमास मराठी ओटीटीवर प्रदर्शित करुन निर्मात्याला कुठलाही मोबदला न देता सुमारे ८२ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी ऍरिस्टोक्रॅट फिल्म प्रोडेक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक साकेत प्रकाश सावंत यांना कुरार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर साकेत सावंतला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत व्हिमास मराठी चॅनेल आणि ऍरिस्टोक्रॅट प्रोडेक्शन कंपनीशी संबंधित अर्चना वाघरे, वैशाली खटावकर, मंजुषा साकेत पवार-सावंत हे सहआरोपी असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.

चंद्रप्रकाश रामबली यादव हे व्यवसायाने वकिल असून मालाड येथे राहतात. त्यांचा वकिलीसह ज्वेलरीचा व्यवसाय आहे. त्यांचा परिचित रामचंद्र सावंत हे पूर्वी सोनी टिव्हीमध्ये काम करत होते. लॉकडाऊनमध्ये त्याच्याकडे काहीच काम नव्हते. यावेळी तो त्यांच्याकडे आला होता. यावेळी त्याच्यासोबत प्रशांत राणे आणि तेजस लोखंडे हे दोघे होते. त्यांनी त्यांना एक मराठी वेबसिरीजची निर्मिती करत असल्याचे सांगून गुंतवणुकदाराची गरज आहे असे सांगितले होते. त्यांनी त्यांच्या वेबसिरीजला फायनान्स करावे अशी विनंती केली होती. मात्र त्यांनी त्यांना नकार दिला होता. यावेळी या तिघांनी त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी निर्माता म्हणून वेबसिरीजमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रोडेक्शन कंपनीची स्थापना करुन त्याची अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे नोंदणी करण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यावरुन त्यांनी चंद्रा फिल्म ऍण्ड इंटरटेनमेंट या नावाने कंपनी स्थापन करुन नोंदणी केली होती. या प्रोडेक्शन कंपनीचे प्रमाणपत्र नंतर त्यांना मिळाले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२० रोजी वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. जानेवारी वेबसिरीजचे शूटींग पूर्ण झाले होते. त्याचे दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केले तर हरिश दुधाडे, संग्राम सामेल, ज्ञानदा रामतिर्थकर, शिल्पा लवलकर, मिरा सारंग, राधा धरणे आदी कलाकारांनी त्यात काम केले होते. या सर्वांचे मानधन त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दिले होते. कॅश स्वरुपात काही व्यवहार झाले असून त्याचे व्हॉऊचर बनविण्यात आले होते. वेबसिरीज सुरु होण्यापूर्वी त्याचे बजेट तीस लाख रुपये होते. मात्र ते बजेट नंतर साठ लाखांपर्यंत गेले होते. त्यानंतर त्यांना पोस्ट प्रोडेक्शनसाठी अतिरिक्त पंधरा लाख रुपये खर्च आला होता.

एप्रिल २०२१ या वेबसिरीजचे पोस्ट प्रोडेक्शन झाल्यानंतर वेबसिरीज आता विक्रीसाठी तयार झाली होती. त्यासाठी रामचंद्र सावंत, प्रशांत राणे, दिग्दर्शक तेजस लोखंडे हे जातीने प्रयत्न करत होते. मात्र त्यांना हवा तसा भाव मिळत नव्हता. याच दरम्यान त्यांनी व्हिमास मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचे लिगल फ्रंन्चाईस असलेले ऍरिस्टोक्रॅट फिल्म प्रोडेक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक साकेत सावंत यांच्याशी जून २०२२ मध्ये बोलणी सुरु केली होती. त्यांनी ही स्टोरी सांगून नंतर त्यांना वेबसिरीज दाखविण्यात आली होती. त्यांनी ती आवडली होती. त्यानंतर साकेत सावंत आणि चंद्रप्रकाश यादव यांच्या फ्रंन्चाईज प्रोजेक्ट करार झाला होता. या करारात त्यांनी ही वेबसिरीज ८२ लाखांमध्ये विकत घेतल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना ती वेबसिरीज प्रदर्शित करण्याचे हक्क दिले होते. वेबसिरीज प्रदर्शित झाल्यानंतर ४५ दिवसांत ३० टक्के २४ लाख ६० हजार, ९० दिवसांत ४० टक्के म्हणजे ३२ लाख ८० हजा आणि १२६ दिवसांत उर्वरित ३० टक्के २४ लाख ६० हजार रुपये देण्याचे ठरले होते. १२ ऑगस्ट २०२२ चंद्रप्रकाश यादव यांनी निर्मिती केलेल्या सिक्रेट ऑफ गावस्कर ही मराठी वेबसिरीज साकेत सावंत यांनी व्हिमास मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केली होती. त्यानंतर त्यांच्यात ठरल्याप्रमाणे त्यांना कराराप्रमाणे पैसे देणे बंधनकारक होते. मात्र त्यांनी ते पेमेंट केले नाही. ऍरीस्टोक्रॅट प्रोडेक्शनच्या वतीने अर्चना वाघरे यांनी त्यांना रिप्लाय दिला, मात्र त्यांना पेमेंट देण्यात आले नाही. अशा प्रकारे व्हिमास मराठी चॅनेल आणि ऍरिस्टोक्रॅट प्रोडेक्शनने त्यांनी निर्मिती केलेल्या सिक्रेट ऑफ गावस्कर ही वेबसिरीज प्रदर्शित करुन त्यांना कुठलेही पेमेंट न देता स्वतचा आर्थिक फायदा करुन त्यांची फसवणुक केली होती.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी व्हिमास मराठी चॅनेल आणि ऍरिस्टोक्रॅट प्रोडेक्शन कंपनीसह साकेत प्रकाश सावंत, अर्चना वाघरे, वैशाली खटापकर, मंजुषा साकेत पवार-सावंत यांच्याविरुद्ध कुरार पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधितांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ४६७, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नऊ महिन्यानंतर व्हिमास मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचे लिगल फ्रंन्चाईस असलेले ऍरिस्टोक्रॅट फिल्म प्रोडेक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक साकेत सावंत यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page