मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२४
मुंबई, – एसआरए फ्लॅटच्या नावाने बजाज कंपनीच्या एका सेल्समनची ३२ लाख ६० हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका मुख्य आरोपीस जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. सुरेश धोंडू पालांडे असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच सुरेश हा पळून गेला होता, अखेर एक वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बजाज कंपनीत सेल्समन म्हणून काम करणारे ४६ वर्षांचे तक्रारदार मंगेश नामदेव शिर्सेकर हे जोगेश्वरी परिसरात राहतात. त्यांचा एक मित्र याच परिसरात राहत असून तिथे एका एसआरए इमारतीचे बांधकाम सुरु होते. या मित्राने त्यांना एसआरए फ्लॅटसाठी इच्छुक आहे का याबाबत विचारणा केली होती. गुंतवणुक म्हणून त्यांनीही त्यास होकार दिला होता. काही दिवसांनी त्याने त्यांची ओळख सुरेश पालांडेशी करुन दिली. सुरेशने आतापर्यंत अनेकांना एसआरएमध्ये फ्लॅट दिले आहे. त्याची स्वामी समर्थ असोशिएट्स नावाची एक संस्था असून ही संस्था एसआरए योजनेत फ्लॅट देण्याचे काम करते असे सांगितले होते. त्यामुळे त्याने सुरेशला जोगेश्वरीतील एसआरए प्रोजेक्टमध्ये एक फ्लॅट मिळवून देण्याची विनंती केली होती. सुरेशने त्यांना प्रोजेक्ट करणारे मराठे आणि सावंत हे त्याचे नातेवाईक असून त्यांना हमखास फ्लॅट देतो असे सांगून त्याच्याकडून ३० नोव्हेंबर २०२० ते २२ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत फ्लॅटसाठी ३२ लाख ६० हजार रुपये घेतले होते. काही दिवसांनी सुरेश त्यांना घेऊन वांद्रे येथील एसआरए कार्यालयात गेला. तिथे त्याने संगणकावर काम करणार्या एका व्यक्तीकडे जोगेश्वरीतील एसआरए प्रोजेक्टची फाईल मागितली होती. ही फाईल पाहिल्यानंतर त्यात त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख होता. त्यामुळे त्यांना सुरेशवर विश्वास बसला होता. फ्लॅटचे पूर्ण पेमेंट झाल्यानंतर सुरेशने त्यांना सहा महिन्यांत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले.
याच दरम्यान कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले होते. त्यामुळे फ्लॅटचा ताबा मिळविण्यास उशीर झाला होता. लॉकडाऊननंतर त्यांनी फ्लॅटविषयी विचारणा सुरु केली होती. यावेळी सुरेश हा त्यांना आज उद्या करुन टाळत होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. घरी गेल्यानंतर तो घरात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्याचे कर्जत आणि कांदिवली येथे प्रॉपटी असून त्यातील एक प्रॉपटी त्यांच्या नावावर करतो असे सांगून कर्जतच्या प्रॉपटीचे कागदपत्रे त्यांना व्हॉटअपवर पाठविले होते मात्र ही प्रॉपटी त्यांच्या नावावर करुन दिली नाही किंवा एसआरएचा फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. सुरेशकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी जोगेश्वरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यांत सुरेश पालांडेविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच सुरेश हा पळून गेला होता. गेल्या एक वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता. अखेर त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांना एसआरए फ्लॅटच्या नावाने गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.