प्रेयसीसोबतचे खाजगी व्हिडीओ व फोटो व्हायरल करुन बदनामी

मरिनड्राईव्ह येथील घटना; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२४
मुंबई, – प्रेयसीसोबत शारीरिक संबंधाचे खाजगी व्हिडीओ आणि फोटो तिच्या आईसह नातेवाईकांना पाठवून प्रियकराने तिची बदनामी केल्याचा प्रकार मरिनड्राईव्ह परिसरात उघडकीस आला आहे. तौहीफ जमीर शरीफ असे या आरोपी प्रियकराचे नाव असून तो मूळचा कर्नाटकच्या म्हैसूरचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२० वर्षांची तक्रारदार तरुणी गेल्या दोन वर्षांपासून मरिनड्राईव्हच्या चंदनवाडी परिसरात राहते. तिच्यासोबत तिचे आजी आणि काका राहतात. संबंधित कुटुंबिय मूळचे कर्नाटकच्या म्हैसूरचे रहिवाशी असून तिचे आई-वडिल तिथेच राहत होते. याच परिसरात राहणार्‍या तौहीफ हा तिचा परिचित असून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाला तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी मुंबईत पाठवून दिले होते. ती सध्या चर्नीरोडच्या एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. या शिक्षणासोबत ती एअरहॉस्टेसचा कोर्स करत आहे. जानेवारी २०२४ रोजी तिचे तौहीफसोबत संमतीने शारीरिक संबंध आले होते. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाईलमध्ये त्यांचे अश्‍लील व्हिडीओ आणि फोटो काढले होते. १९ जून २०२४ रोजी ती अंधेरी येथून क्लास संपल्यानंतर घरी जात होती. यावेळी तिथे तौहीफ आला आणि त्याने तिच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने तिला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर तो पळून गेला होता. हा प्रकार तिने तिच्या काकांना फोनवरुन सांगितला. त्यानंतर त्यांनी आझाद मैदान पोलिसांत तौहीफविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांची तर त्यांच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध म्हैसूरच्या एनआर पोलिसांतही तक्रार केली होती. मोहरम असल्याने तिचे आई-वडिल, भाऊ आणि बहिण मुंबईत तिला भेटण्यासाठी आले होते.

दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात लग्नाविषयी चर्चा झाली होती. मात्र तिने लग्नास नकार दिला होता. याच दरम्यान तौहीफने सोशल मिडीयावर तिच्या आईसह काकांना त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे व्हिडीओ आणि फोटो पाठवून तिची बदनामीचा प्रयत्न केला. ते व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. घडलेल्या घटनेची त्यांनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने त्याच्यासोबत तिचे शारीरिक संबंध आल्याची कबुली दिली. मात्र त्यांच्यातील खाजगी व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्याने तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने तौहीफविरुद्ध आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ७५ (१), (३), ७७ भारतीय दंड संहिता सहकलम ६६ (ई), ६७, ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तौहीफ हा पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तो कर्नाटकला पळून गेल्याची शक्यता असल्याने आझाद मैदान पोलिसांची एक टिम तिथे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page