मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२४
मुंबई, – आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे सव्वाचार कोटी रुपये किंमत असलेल्या एमडी आणि चरसच्या साठ्यासह चार ड्रग्ज तस्करांना गुन्हे शाखेच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. गुरुवारी दिवसभरात ही कारवाई शिवडी, मानखुर्द, दहिसर आणि माझगाव परिसरात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या चौघांकडून पोलिसांनी १५० ग्रॅम वजनाचे एमडी तर ७ किलो ९५४ ग्रॅम वजनाचे चरसचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत चौघांनाही शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच शिवडी परिसरात कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची डिलीव्हरी होणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. ठरल्याप्रमाणे तिथे एक तरुण आला होता. या तरुणाची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ७ किलो ९५४ ग्रॅम वजनाचे चरस सापडले. त्याची किंमत ३ कोटी ९८ लाख रुपये इतकी आहे. चौकशीत तो तिथे ड्रग्जची डिलीव्हरीसाठी आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. अशाच अन्य एका कारवाईत आझाद मैदान युनिटच्या अधिकार्यांनी माझगाव येथून अन्य एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी पंधरा ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे तीन लाख रुपये आहे. दहिसर येथे कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी ३८ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केला. त्याची किंमत पावणेचार लाख रुपये इतकी आहे. ही कारवाई सुरु असताना मानखुर्द येथू घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी अन्य एका आरोपीस ९७ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जसहीत अटक केली. त्याची किंमत १९ लाख रुपये इतकी आहेत. या चारही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर चौघांना शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांना चरस आणि एमडी ड्रग्ज कोणी दिले, ते ड्रग्ज कोणाला देण्यासाठी तिथे आले होते, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.