दहा आणि पंधरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
एका आरोपीस अटक तर पळून गेलेल्या दुसर्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जुलै २०२४
मुंबई, – दहा आणि पंधरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना वांद्रे आणि दादर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेरवाडी आणि दादर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन एका आरोपीस अटक केली तर पळून गेलेल्या दुसर्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार मुलगी पंधरा वर्षांची असून ती वांद्रे येथे राहते. ४८ वर्षांचा आरोपी तिच्याच शेजारी राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजता ही मुलगी इमारतीच्या पायर्या चढून घरी जात होती. यावेळी तिथे आरोपी तिथे आला आणि त्याने तिच्याशी अश्लील संभाषण करुन लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने त्याच्या पॅण्टच्या चैनला हात लावून तिच्याकडे पाहून अश्लील इशारे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी तिला खेरवाडी पोलीस ठाण्यात आणले. तिथे उपस्थित पोलिसांना प्रकार सांगून तिने आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ७९ भारतीय न्याय सहिता सहकलम १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
दुसरी घटना दादर परिसरात घडली. २९ वर्षांची तक्रारदार महिला दादर परिसरात राहत असून तिला दहा वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता ही मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत ट्यूशनसाठी गेली होती. लिफ्टमधून जाताना एका साडी विक्रेत्या अज्ञात व्यक्तीने तिला वारंवार अश्लील स्पर्श केला. तिला मिठी मारुन तिच्या गालाची किस घेऊन तिचा विनयभंग केला. तिच्या तोंडावर हात ठेवून हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली आणि तेथून पळून गेला होता. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी दादर पोलिसांना ही माहिती दिली. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ७४, ७५, १२६ (२), ३५१ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दादर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या इमारतीसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. गुरुवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.