आंतरराष्ट्रीय डी जे म्युझिक कार्यक्रमांत गुंतवणुकीच्या नावाने गंडा
कौटुंबिक मित्राविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जुलै २०२४
मुंबई, – आंतरराष्ट्रीय डी जे म्युझिक कार्यक्रमांत गुंतवणुकीवर दुप्पट रक्कम देतो असे सांगून एका वयोवृद्धाची त्याच्याच मित्राने सुमारे एक कोटीची फसवणुक केली. याप्रकरणी कौटुंबिक मित्र असलेल्या रंजीत कडिगनाहल्ली राधाकृष्ण याच्यविरुद्ध पवई पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच रंजीतची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुंदर कृष्णस्वामी सुसाले हे ६२ वर्षांचे वयोवृद्ध अंधेरीतील चांदीवली परिसरात त्यांची पत्नी आणि मुलीसोबत राहतात. ते अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतून एप्रिल २०२१ रोजी निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी उषा ही बंगलोर येथील टायटन इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीत कामाला होता. त्यावेळेस ते सर्वजण बंगलोर येथे वास्तव्यास होते. २००४ ते २००८ या कालावधीत ते बंगलोरच्या एका खाजगी कंपनीत कामाला होते. याच दरम्यान त्यांची रंजीत राधाकृष्णसोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. या ओळखीत रंजीतने त्याला डी जे म्युझिक सिस्टीम कार्यक्रमांची आवड असल्याचे सांगितले ोते. २००८ साली त्यांची कंपनी बंद झाली होती, त्यामुळे त्यांच्या पत्नीने तिच्या कंपनीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सुसाले कुटुंबिय मुंबईत आले होते. काही वर्ष रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीत नोकरी सुरु केली होती.
मे २०१८ रोजी रंजीत हा त्यांना भेटण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने तो आंतरराष्ट्रीय डी. जे म्युझिक कार्यक्रम सुरु करणार असून त्याला पैशांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या कार्यक्रमासाठी गुंतवणुक करावी. या कार्यक्रमांतून येणार्या रक्कमेतून त्याने त्याला गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट देतो असे सांगितले. त्यांच्यात चांगली मैत्रीसह कौटुंबिक संबंध असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला एक कोटी सहा लाख रुपये दिले होते. या व्यवहाराबाबत त्यांनी कायदेशीर करार केला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना दुप्पट रक्कमेसह पैसे परत केले नाही. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. पोलिसांत तक्रार केल्यास जिवाचे बरे वाईट करुन घेईन असे सांगून तो त्यांना धमकी देत होता.
नोव्हेंबर २०१८ ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत रंजीतने आंतरराष्ट्रीय डी जे म्युझिक कार्यक्रमांसाठी पैसे घेऊन व्याजासह पैसे न देता त्यांची फसवणुक केली होती. पैशांची मागणी केल्यानंतर जिवाचे बरे-वाईट करुन धमकी देऊन त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार पवई पोलिसांना सांगून रंजीत राधाकृष्णविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. रंजीत हा मूळच कर्नाटकच्या बंगलोर, सिनाप्पा लेआऊट, कोडिचिक्कनहल्लीचा रहिवाशी आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी लवकरच पवई पोलिसांची एक टिम बंगलोर जाणार आहे.