ब्रोकरच्या आत्महत्येप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
रुमच्या व्यवहारात फसवणुकीसह धमकी दिल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जुलै २०२४
मुंबई, – बोरिवलीतील ब्रोकर शैलेश पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी सहाजणांविरुद्ध शीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेश चक्रे, संतोष मनाला, रवि तळेकर, दिलीप मुरुडकर, अविनाश पवार आणि प्रविण माटे अशी या सहाजणांची नावे आहेत. रुमच्या व्यवहारात झालेल्या फसवणुकीसह जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याने मानसिक नैराश्यातून शैलेश पाटील यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नीने करुन संबंधित सहाजणांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे या आरोपांचा पोलिसांकडून तपास सुरु असून चौकशीनंतर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
राजश्री पाटील ही महिला बोरिवलीतील टाटा पॉवर हाऊस, जय महाराष्ट्र नगरात तिच्या मुलगा आणि सूनेसोबत राहते. तिचे पती शैलेश पाटील हे ब्रोकर म्हणून काम करत होते. ८ जूनला ते घरी आल्यानंतर प्रचंड तणावात होते, त्यामुळे तिने त्यांना तणावाबाबत विचारणा केली होती. यावेळी शैलेशने तिला दिलीप मुरुडकर या व्यक्तीने त्यांची रुमच्या व्यवहारात फसवणुक केली तर विशाल मकवाना हा सुरेश चक्रे या व्यक्तीच्या मदतीने त्यांना धमकावित असल्याचे सांगितले. १० जूनला शैलेश कामासाठी घरातून निघून गेला आणि रात्री उशिरा घरी आला. याच दरम्यान त्यांना एक कॉल आला. हा सुरेशचा होता, त्याने फोनवरुन त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली होती. या घटनेनंतर शैलेशने बोरिक ऍसिड पावडर प्राशन केले होते. त्यात त्याची प्रकृती बिघडल्याने पाटील कुटुंबियांनी त्यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांनी राजश्रीला त्यांची रुमच्या खरेदी-विक्रीमध्ये फसवणुक झाल्याचे सांगितले. त्यामुळे काही दिवसांपासून ते प्रचंड मानसिक तणवात होते. तसेच त्यांच्याकडे राजश्रीला एक पत्र सापडले होते. त्यात सुरेश चक्रे हा त्यांना जिवे मारण्याची धमकी देत होता तर संतोष मनाला, रवी तळेकर, दिलीप मुरुडकर, प्रविण माटे व अविनाश पवार यांनी त्याची आर्थिक फसवणुक केल्याचे नमूद केले होते. त्यांच्याकडून झालेल्या फसवणुकीसह जिवे मारण्याच्या धमकीला आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.
दुसरीकडे शैलेश यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शीव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर राजश्री पाटील हिने संबंधित सहाजणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सुरेश चक्रे, संतोष मनाला, रवि तळेकर, दिलीप मुरुडकर, अविनाश पवार आणि प्रविण माटे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच या सहाजणांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या आत्महत्येत या सहाजणांचा काय सहभाग होता, शैलेश यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगितले.