मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जुलै २०२४
मुंबई, – धारावी परिसरात रविवारी रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने अचानक गोळीबार केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करताच दोन्ही आरोपींना धारावी पोलिसांनी काही तासांत अटक केली. मोहम्मद शहानवाज मोहम्मद अस्लम शेख आणि मोहम्मद आलम मुबारकअली आलम अशी या दोघाचंी नावे असून त्यांच्याकडून गुन्ह्यांतील देशी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यातील मोहम्मद शहानवाज या गुन्ह्यांतील तक्रारदार असून त्याच्याच सांगण्यावरुन मोहम्मद आलम हा गोळीबार केला होता. केवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा गोळीबार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मोहम्मद शहानवाज हा तरुण धारावीतील वैभव इमारतीजवळील कल्याणवाडी, राजीव गांधी नगरात राहतो. रात्री साडेतीन वाजता तो परिसरात उभा होता. यावेळी तिथे एक तरुण आला. त्याने त्याच्या तोंडावर रुमाल बांधला होता. काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर काढून हवेत गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर तो तेथून पळून गेला होता. या गोळीबारानंतर मोहम्मद शहानवाज याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. या माहितीनंतर धारावी पोलिसासह गुन्हे शाखेच्य अधिकार्यांनी तिथे धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद शहानवाज याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याने संबंधित व्यक्ती दहा ते पंधरा फुटावर उभा होता. तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने त्याचा चेहरा पाहता आला नाही. गोळीबार करुन तो लगेचच पळून गेला होता. त्याच्या चालण्यावरुन त्याने मद्यप्राशन केले असावे असा संशय होता. ही गोळी एका दुकानाच्या ग्रिलला लागली होती. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाला नाही. घटनास्थळाहून पोलिसांनी एक रिकामी पुंगळी हस्तगत केली आहे. याप्रकरणी मोहम्मद शहानवाज याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच मोहम्मद शहानवाजला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून तो विसंगत माहिती देत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याला पोलिसी धाक दाखवविताच त्यानेच त्याचा सहकारी मोहम्मद आलमसोबत हा गोळीबार केल्याची कबुली दिली. या दोघांनाही परिसरात दहशत निर्माण करायची होती. त्यामुळे मोहम्मद शहानवाजने मोहम्मद आलमला देशी बनावटीचे पिस्तूल दिले आणि गोळीबार करण्यास सांगितले होते. या गोळीबारानंतर त्याने कंट्रोल रुमला ही माहिती दिली. तपासात त्याने गोळीबार करुन आरोपी पळून गेल्याचे सांगताना त्याने मद्यप्राशन केले असावे असा संशय व्यक्त केला होता. मात्र त्याची कसून चौकशी केल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याच्यासह त्याचा सहकारी मोहम्मद आलम याला पोलिसांनी अटक केली. ते दोघेही धारावीतील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.