मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ जुलै २०२४
मुंबई, – भरवेगात स्कूटर चालविण्याच्या नादात झालेल्या अपघातात परिता कमलेश गोस्वामी या २६ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला तर स्कूटरचालक तरुण आयुष लक्ष्मणसिंग खंडारी (२३) हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर जोगेश्वरीतील टॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी आयुषविरुद्ध अंधेरी पोलिसांनी हलगर्जीपणा गुन्हा दाखल केला असून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.
हा अपघात मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजता अंधेरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, विलेपार्लेच्या दिशेने जाणार्या मेट्रो ब्रिजच्या साऊथ बॉण्डवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शामचरण भगवान गावडे हे अंधेरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी नऊ वाजता ते पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सायंकाळी साडेचार वाजता अंधेरी पोलिसांना मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून कॉल आला होता. त्यात मेट्रो ब्रिजजवळ अपघात झाला असून पोलीस मदतीची गरज आहे. या कॉलनंतर ते त्यांच्या सहकार्यांसोबत घटनास्थळी गेले होते. मेट्रो ब्रिजजवळ त्यांना एका स्कूटर डिवायडरला धडक दिल्याचे दिसून आले. बाजूला एका तरुणीसह दोघेजण जखमी अवस्थेत पडले होते. त्यामुळे जखमी झालेल्या तरुणीला तातडीने कूपर तर तरुणाला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या तरुणीला डॉ. अभिजीत तपासून मृत घोषित केले. त्यांच्याकडे मिळालेल्या आधारकार्डसह इतर कागदपत्रांवरुन जखमी तरुणाचे नाव आयुष खंडारी असून तो कांदिवलीतील सिंग इस्टेट रोड, गुलमोहर सोसायटीमध्ये राहतो तर मृत तरुणीचे नाव परिता गोस्वामी असून ती घाटकोपरच्या टिळकनगर परिसरात राहत होती.
घटनास्थळी असलेल्या सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली असता आयुष हा स्कूटर भरवेगात चालवत होता तर परिता त्याच्या मागे बसली होती. भरवेगात स्कूटर चालविण्याच्या प्रयत्नात त्याचा स्कूटरवरील नियंत्रण सुटले आणि स्कूटरने डिवायडरला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात ते दोघेही जखमी झाले. हलगर्जीपणाने स्कूटर चालवून स्वतला जखमी होण्यास तर परिता गोस्वामी हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयुष खंडारी याच्याविरुद्ध अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून उपचारानंतर त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.