मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ जुलै २०२४
मुंबई, – सुमारे ८५ लाखांच्या एमडी ड्रग्जसहीत दोघांना दहिसर आणि कुर्ला येथून कांदिवली युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी ४४४ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. एमडी ड्रग्ज विक्री करणारी एक टोळी असून या टोळीच्या इतर सहकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ यांनी सांगितले.
गुरुवारी २५ जुलैला दहिसर येथे एमडी ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या एका संशयित तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कारवाईत त्याच्याकडून पोलिसांनी ३८ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या चौकशीत त्याच्या दुसर्या सहकार्याचे नाव समोर आले होते. तो बुधवारी ३१ जुलैलला कुर्ला येथील टिळकनगर टर्मिनस परिसरात एमडी ड्रग्जची डिलीव्हरी येणार असल्याची माहिती समजली होती. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ यांच्या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून या आरोपीस अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ४०६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ४४४ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ८५ लाख रुपये आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई शहरात एमडी ड्रग्ज विक्री करणार्या काही टोळ्या कार्यरत असून त्यापैकी हीच एक टोळी आहे. या दोघांच्या चौकशीतून त्यांच्या इतर सहकार्यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.