मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टर महिलेचे रिक्षात विसलेले सहा तोळे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपयांची कॅश काही तासांत समतानगर वाहतूक पोलीस ठाण्याच्या महिला अंमलदार संगीता शिवाजी चव्हाण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे विकास राठोड यांनी परत मिळवून दिले. काही तासांत संपूर्ण मुद्देमाल परत मिळवून देणार्या संगीता चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संगीता चव्हाण या मिरारोड येथे राहत असून गेल्या एक वर्षांपासून समतानगर वाहतूक पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी दुपारी बारा वाजता संगीता या त्यांचे सहकारी विकास राठोड यांच्यासोबत कांदिवलीतील बिग बाजारजवळ कर्तव्य बजावत होत्या. यावेळी त्यांच्याकडे मानसी सावंत या महिला आल्या. मानसी या केईएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असून कांदिवलीतील हनुमाननगर परिसरातील एका शाळेतील कार्यक्रमासाठी आल्या होत्या. रिक्षातून प्रवास करताना सोन्याचे दागिने आणि कॅश असलेली बॅग रिक्षात विसरल्याचे सांगून ही बॅग शोधून देण्याची विनंती केली. मानसी सावंत हिला रिक्षाचा क्रमांक माहित नव्हता. तरीही संगीता चव्हाण यांनी क्षणांचाही विलंब न लावता विकास राठोड याच्या मदतीने कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणार्या रिक्षाचा शोध सुरु केला. यावेळी त्यांनी प्रत्येक रिक्षाची तपासणी सुरु केली होती. याच दरम्यान एका रिक्षात त्यांना मानसी सावंत यांचे दागिने आणि कॅश असलेली बॅग सापडली. ही बॅग त्यांना दाखवून त्यांनी ते दागिने आणि कॅश त्यांच्या स्वाधीन केले. रिक्षात विसरलेला मुद्देमाल काही तासांत संगीता चव्हाण आणि विकास राठोड यांनी परत मिळवून दिल्याबद्दल मानसी सावंत यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच या कामगिरीबाबत सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त नितेश गठ्ठे, प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे व त्यांच्या सहकार्यांनी संगीता चव्हाण आणि विकास राठोड यांचे कौतुक केले होते. या कामगिरीबाबत त्यांचे नाव रिवॉर्डसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.