पत्नीसोबत अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

एक लाखाच्या खंडणीसाठी धमकाविणार्‍या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर पत्नीसोबत अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका डिलीव्हरी बॉय तरुणाकडे एक लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी आरोपीस वनराई पोलिसांनी अटक केली. अहमद खान ऊर्फ नूर खान असे या आरोपीचे नाव असून तो जोगेश्‍वरीतील बेहरामबागचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईलसह मेमरी कार्ड हस्तगत केला आहे.

२५ वर्षांचा तक्रारदार तरुण डिलीव्हरी बॉय असून तो त्याच्या वडिलांसोबत गोरेगाव तर त्याची आई आणि पत्नी विरार येथे राहतात. जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात तो डिलीव्हरीसाठी अंधेरी येथे आला होता. यावेळी त्याचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता. मोबाईल चोरीची तक्रार त्याने आंबोली पोलीस ठाण्यात केली होती. २६ जुलैला तो त्याच्या घरी होता. यावेळी त्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो अहमद खान बोलत असल्याचे सांगितले. त्याने त्याच्या मोबाईलची मेमरी कार्ड त्याच्याकडे असून त्यात त्याचे त्याच्या पत्नीसोबत काही खाजगी व्हिडीओ आहेत. ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर ते व्हिडीओ व्हायरल करुन त्यांची बदनामीची धमकी दिली होती. ३० जुलैला अहमदने त्याला सांताक्रुज येथील वाकोला, स्वागत हॉटेलजवळ बोलाविले होते. त्यामुळे तो तिथे त्याला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने त्याच्या पत्नीसोबत खाजगी व्हिडीओ दाखवून पुन्हा एक लाख रुपयांच्या खंडणसाठी धमकी दिली. पैसे दिले नाहीतर ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करु असेही सांगितले. त्यामुळे त्याने त्याला एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती.

डिलीव्हरी बॉय म्हणून नोकरी करत असल्याने त्याला एक लाख रुपये जमा करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने घडलेला प्रकार वनराई पोलिसांना सांगून तिथे अहमदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक संग्राम एकाळे यांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर या तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अहमद खानविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शनिवारी तो पैसे घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page