विनयभंगासह लैगिंक अत्याचाराच्या तीन घटनेने संताप
विक्रोळीत पुतणीवर काका तर मानखुर्दमध्ये नातीवर मुलाकडून अत्याचार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – गेल्या २४ तासांत विनयभंगासह लैगिंक अत्याचाराच्या तीन वेगवेगळ्या घटनेत स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. विक्रोळीत चार वर्षांच्या अल्पवयीन पुतणीचा तिच्याच काकाने तर मानखुर्द येथे सतरा वर्षांच्या नातीवर वयोवृद्ध महिलेच्या मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माहीम, मानखुर्द आणि विक्रोळी पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली असून एका आरोपीस अटक केली तर पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरु केला आहे.
तक्रारदार महिला विक्रोळी येथे राहत असून तिला चार वर्षांची मुलगी आहे. आरोपी हा तिचा दिर असून तो विक्रोळी परिसरात राहतो. शनिवारी सायंकाळी ती तिच्या मुलीला आंघोळ घालत होती. यावेळी तिला मुलीच्या प्रायव्हेट भागावर जखम असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने तिच्याकडे विचारपूस केली होती. यावेळी या मुलीने तिच्या काकांनी तिच्यावर त्याच्या राहत्या घरी जानेवारी महिन्यांत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर तिने विक्रोळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या दिराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
दुसरी घटना मानखुर्द परिसरात घडली. साठ वर्षांची तक्रारदार महिला ही मानखुर्द परिसरत राहत असून सतरा वर्षांची पिडीत तिची नात आहे. ती आठ-नऊ वर्षांची असताना तिचा मुलगा तिच्यावर अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होता. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्याच्याच त्याने गैरफायदा घेण्यास सुरुवात केली होती. गेल्या तीन-चार वर्षांपासून घरात कोणीही नसताना तो तिच्यावर सतत लैगिंक अत्याचार करत होता. गुरुवारी १५ ऑगस्टला घरात कोणी नव्हते. यावेळी त्याने तिला पुन्हा कपडे काढण्यास प्रवृत्त करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. दोन दिवसांनी तिने हा प्रकार तिच्या तक्रारदार आजीला सांगताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या घटनेनंतर तिने मानखुर्द पोलिसांत तिच्याच मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी ६४, ६४ (२), (एफ), ६४ (२), (एम), ६४ (१), ११५ (२), ३५१ (३) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १०, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाख केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी मुलगा पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अन्य एका घटनेत माहीम पोलिसांनी २३ वर्षांच्या सुजीत नावाच्या एका तरुणाला अटक केली. सुजीतचे एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधती अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. ही मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन माहीम पोलिसांनी आरोपी प्रियकर सुजीतविरुद्ध ३७६, ३७६ (२), (एच), (एन) भादवी सहकलम ४, ५ (जे), (२), ५ (एल) (क्यू), ६ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला शनिवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.