म्हाडा फ्लॅटच्या नावाने रेल्वेच्या अधिकार्याची फसवणुक
बोगस पावत्या-अलॉटमेंट देणार्या भामट्याला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या नावाने रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर अधिकार्याची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका भामट्याला कांदिवली पोलिसांनी अटक केली. गणेश विठ्ठल दळवी असे या भामट्याचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. गणेशने म्हाडाच्या बोगस पावत्या आणि अलॉटमेंट लेटर देऊन या इंजिनिअरकडून घेतलेल्या आठ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप असून त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
५८ वर्षांचे तक्रादार श्रीनिवास दुरई राजू हे कांदिवलीतील पश्चिम रेल्वेच्या कर्मचारी वसाहतीत राहत असून ते रेल्वेत सिनिअर सेक्शन इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांना त्यांच्या मुलीसाठी एक फ्लॅट घ्यायचा होता. त्यसाठी त्यांचे प्रयत्न सुरु असताना त्यांनी फ्लॅटविषयी त्यांच्या काही परिचित व्यक्तींना सांगितले होते. याच दरम्यान त्यांची गणेश दळवीशी ओळख झाली होती. त्याने त्याची म्हाडामध्ये ओळख असून त्यांना म्हाडाचा फ्लॅट घेण्यास मदत करतो असे सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी त्याने त्यांना बोरिवलीतील कांदिवली गावठाण, महावीरनगर परिसरात म्हाडाच्या एका इमारतीचे काम पूर्ण झाले असून त्यात त्यांना ४८० चौ. फुटाचा हा फ्लॅट ५० लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला फ्लॅटसाठी आठ लाख रुपये दिले होते. ही रक्कम म्हाडा कार्यालयता जमा केल्याच्या त्याने बोगस पावत्या दिल्या होत्या. त्यानंतर त्याने त्यांना महावीरनगरच्या म्हाडा इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ५०३ क्रमांकाचे अलॉटमेंट लेटरची एक झेरॉक्स प्रत देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याा प्रयत्न केला. मात्र फ्लॅटचे रजिस्ट्रेशन आणि इतर कारवाईसाठी वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या मित्रासह बहिणीमार्फत म्हाडा कार्यालयात चौकशी केली होती. या चौकशीत त्यांनी दिलेले सर्व पावत्या आणि फ्लॅटचे अलॉटमेंट लेटर बोगस असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे श्रीनिवास यांनी गणेशला जाब विचारुन फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांचे पैसे परत केले नाही.
अशा प्रकारे गणेश दळवीने म्हाडाचा फ्लॅट देतो असे सांगून त्यांच्याकडून घेतलेल्या आठ लाखांचा अपहार करुन म्हाडाच्या बोगस पावत्यासह अलॉटमेंट देऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर गणेश दळवीविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच दोन महिन्यांपासून फरार असलेल्या गणेशला कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. तपासात गणेशने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोेलिसांनी सांगितले.