ग्राफिक डिझायनरसह ऍड्राईड डेव्हलपर अटक व कोठडी

बोगस वेबसाईट बनवून म्हाडासह अर्जदारांची फसवणुकप्रकरण

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) बोगस वेबसाईट बनवून म्हाडाच्या अर्जदाराकडून बोगस वेबपोर्टलद्वारे पैसे स्विकारुन फसवणुक करणार्‍या एका टोळीच्या अन्य दोन आरोपींना पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी केली आहे. त्यात ग्राफिक डिझायनर ओमप्रकाश चतुर शिंदे आणि ऍड्राईड डेव्हल्पर सत्यम राजेश तिवारी यांचा समावेश असून ते दोघेही वन टेक मिडीया कंपनीचे कर्मचारी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने सोमवार २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या चार झाली असून यापूर्वी कल्पेश सेवक आणि अमोल पटेल या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

अलीकडेच म्हाडाच्या वतीने सायबर सेल पोलिसांत एक तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यात काही अज्ञात व्यक्तींनी म्हाडाची बोगस वेबसाईट बनवून अर्जदारांना पैसे भरण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी या आरोपीविरुद्ध ३१९ (२), ३१८ (४), ३३६ (२), ३३८, ३३६ (३), ३४० (२), ६१ भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (क), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल पोलिसांनी कल्पेश आणि अमोल या दोघांना अटक केली होती. चौकशीत ते दोघेही म्हाडाचे एजंट म्हणून काम करतात. अमोलचे बारावी तर कल्पेशचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी अनेकांना म्हाडाचे घर देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून ते तक्रारदारांना म्हाडा इमारतीच्या बांधकाम साईटवर बोलवत होते. आपण म्हाडाचे अधिकारी असल्याचे सांगून ते तक्रारदारांचा विश्‍वास संपादन करत होते. त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत करुन त्यांना त्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे भरण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यानंतर त्यांना म्हाडाची बोगस पावती दिली जात होती. चौकशीदरम्यान त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली होती.

या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत उत्तेकर, पोलीस भूवड, पोलीस शिपाई तकिक, देसाई, जाधव, काळे यांनी ओमप्रकाश शिंदे आणि सत्यम तिवारी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यातील ओमकार हा डिलाईल रोड, जेकब सर्कलजवळील ना. म जोशी मार्गाच्या हरहरवाला इमारतीमध्ये राहत असून तो वन टेक मिडीया या कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो. त्याचे बी कॉमपर्यंत शिक्षण झाले असून त्याने ग्राफिक डिझायनरचा डिप्लोमा केला आहे. सत्यम तिवारी हा नालासोपारा येथील अचोले रोडच्या संयुक्त नगरच्या गंगोत्री अपार्टमेंटमध्ये राहतो. तो वन टेक कंपनीत ऍड्राईड डेव्हल्पर म्हणून कामाला आहे. त्याने बी टेकच्या दुसर्‍या वर्षांत ड्रॉप घेतला होता. या दोघांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page