मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका टँकरची बाईकला धडक लागून झालेल्या अपघातात प्रतिक रमेश शहा या ४१ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून आत्मसमर्पण केलेल्या टँकरचालक राजकुमार संतलाल हरिजन याला अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे-पाटील यांनी सांगितले.
हा अपघात मंगळवारी २० ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता वांद्रे येथील बीकेसी फॅमिली कोर्ट जंक्शनजवळ झाला. भाविक रमेश शहा हा शीव परिसरात राहत असून वरळी येथे गारमेंटचे काम करतो. मृत प्रतिक हा त्याचा मोठा असून तो बीकेसी येथील भारत डायमंड बोर्सच्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता प्रतिक हा नेहमीप्रमाणे कामावर त्याच्या बाईकवरुन घरातून निघाला होता. साडेआठ वाजता तो फॅमिली कोर्ट जंक्शन येथून जात होता. यावेळी तेथून जाणार्या एका टँकरने त्याच्या बाईकला धडक दिली होती. या अपघातात प्रतिक हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला गुरुनानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघाताची माहिती मिळताच बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ही माहिती नंतर प्रतिकच्या पत्नीला फोनवरुन देण्यात आली होती. त्यानंतर शहा कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये आले होते.
याप्रकरणी भाविक शहा याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टँकरचालक राजकुमार हरिजन याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टँकर चालवून एका बाईकस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर राजकुमार हा स्वतहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यामुळे त्याला याच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली. राजकुमार हा माहीमच्या रेतीबंदर परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.