मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने झाडाला जोरात धडक दिली. या अपघातात कारचालकासह त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रोहित भाऊसाहेब निकम आणि सिद्धार्थ राजेश ढगे अशी यांचा समावेश असून ते दोघेही विक्रोळीतील कन्नमवारनगरचे रहिवाशी होते. याप्रकरणी कारचालक सिद्धार्थ ढगे याच्याविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून स्वतसह मित्राच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात बुधवारी रात्री साडेबारा वाजता विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्गावरील दक्षिण वाहिनीवरील प्रविण हॉटेलसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सिद्धार्थ ढगे हा २३ वर्षांचा तरुण विक्रोळीतील कन्नमवारनगर, स्वयंभू हनुमान नगरात राहत असून रोहित निकम (२९) हा त्याचा मित्र आहे. बुधवारी रात्री रोहित हा सिद्धार्थच्या कारमधून विक्रोळीच्या दिशेने जात होता. ही कार प्रविण हॉटेलसमोर येताना सिद्धार्थने कार भरवेगात चालविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने कारची एका झाडाला जोरात धडक दिली होती. या अपघातात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोघांनाही पोलिसांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे कारचालक सिद्धार्थ ढगे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या दोघांच्या मृत्यूने कन्नमवारनगर परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.