चार वर्षांच्या ५५ वर्षांच्या पित्याकडून लैगिंक अत्याचार
मालाडच्या मालवणीतील घटना; पित्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – गेल्या आठवड्यात शिवडीसह मालाड परिसरात जन्मदात्या पित्याने त्याच्याच अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच अशीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना मालाडच्या मालवणी परिसरात पुन्हा उघडकीस आली आहे. आपल्या चार वर्षांच्या मुलीवर ५५ वर्षांच्या पित्याने लैगिंक अत्याचार करुन जाब विचारणा पत्नीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पत्नीच्या तक्रार अर्जावरुन मालवणी पोलिसांनी पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
२५ वर्षांची तक्रारदार महिला ही मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिचा ५५ वर्षांचा पती बिगारी कामगार असून तिला चार वर्षांची एक मुलगी आहे. सोमवारी १९ ऑगस्टला घरातील सर्व काम संपल्यानंतर ती झोपली होती. यावेळी तिचा पती घरात होता. काही वेळानंतर त्याने तिच्या चार वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यामुळे तिच्या प्रायव्हेट जागेवर जखम झाली होती. काही वेळानंतर तक्रारदार महिला घराबाहेर गेली आणि परत आल्यानंतर तिला तिचे पती नग्नावस्थेत तिच्या मुलीच्या शेजारी बसल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला बेदम मारहाण केली होती. मुलीकडून घडलेला प्रकार समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
या घटनेनंतर तिने तिच्या मुलीसोबत मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जन्मदात्या पित्याविरुद्ध ६४ (२), (एफ), ६५ (२), ७४, भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ५ (एल), ५ (एस), (एन), ६, ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच बुधवारी रात्री उशिरा आरोपी पित्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत चार वर्षांच्या मुलीला मेडीकलसाठी पाठविण्यात आले असून त्याचा रिपोर्ट लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे.
गेल्याच आठवड्यात शिवडी आणि मालाडच्या मालवणी परिसरात पित्याने त्याच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर पुन्हा अशाच प्रकारची तिसरी घटना घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलीच आता त्यांच्या स्वतच्या घरात सुरक्षित नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.