बँकेचे एटीएम सेंटरमध्ये चोरीच्या प्रयत्नाने खळबळ
मालाड येथील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – बँकेचे एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कुरार पोलिसांनी चोरीचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. एटीएम सेंटरमधील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहीतकुमार अनिल मित्तल हे मालाडच्या कुरारगाव परिसरात राहतात. सध्या ते कुरारगाव, त्रिवेणीनगर परिरात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. शनिवारी बँकेला सुट्टी होती, त्यामुळे ते त्यांच्या घरीच होते. रात्री उशिरा दोन वाजता त्यांना त्यांच्या हैद्राबाद येथील आयव्हीआयएस सर्व्हिलन्स कंपनीतून कॉल आला होता. यावेळी संबंधित अधिकार्यांनी त्यांच्या बँकेच्या शेजारील एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे तिथे जाऊन पाहणी करा असे सांगण्यात आले होते. त्यामुळे ते बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. तिथे त्यांना कोणीही दिसून आले. एटीएम सेंटरच्या आत प्रवेश केल्यानंतर त्यांना एटीएमचे हुडचे लॉक तुटलेले दिसून आले. अज्ञात व्यक्तीने तिथे प्रवेश करुन एटीएम मशिन तोडण्याचा तसेच आतील पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र त्याला पैसे काढता आले नाही.
चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर तो ऍक्सिस बँकेचा एक डेबीट कार्ड तिथेच टाकून पळून गेला होता. घडलेला प्रकार त्यांनी कुरार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चोरीच्या प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित डेबीट कार्डसह एटीएम सेंटरमधील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने बँकेच्या इतर अधिकारी आणि खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली होती.