लैगिंक अत्याचारानंतर गर्भपातास प्रवृत्त करणार्‍या प्रियकराला अटक

मालवणी पोलिसांची कारवाई; पोलीस कोठडीत रवानगी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – चार वर्ष लैगिंक अत्याचार करुन प्रेयसीला गर्भपात करण्यास प्रवृत्त करुन पळून गेलेल्या आरोपी प्रियकराला अखेर मालवणी पोलिसांनी अटक केली. प्रसाद शिवानंद मुन्शी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर चार वर्षांनी सर्व संबंध तोडून पलायन केल्याचा प्रसादवर आरोप आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही तरुणींची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

२४ वर्षांची पिडीत तरुणी ही मालाड येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. सहा वर्षांपूर्वी ती मालाड येथील एका ऍनिमेशन कोर्ससाठी जात होती. तिथेच तिची प्रसादशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. अनेकदा ते दोघेही आक्सा बिचवर भेटत होते. याच दरम्यान त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिनेही त्याला होकार दिला होता. लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. यावेळी त्याने मुलाची जबाबदारी घेण्यास सक्षम नसल्याचे सांगून तिला जबदस्तीने गर्भपात करण्यास प्रवृत्त केले होते. मे २०२४ तिने त्याच्याकडे लग्नाविषयी विचारणा सुरु केली होती. मात्र लग्नाचा विषय येताच तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांनी त्याने तिला लग्न करणार नाही असे सांगून तिच्याशी असलेले सर्व सबंध तोडून टाकले होते. त्यानंतर तो निघून गेला. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिच्यावर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले होते.

घडलेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला. त्यांनी तिला धीर देत त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने प्रसादविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ६९, ८९ भारतीय न्यास सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच प्रसादचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना दोन दिवसांपूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page