शहरात तीन घटनेत सहा अल्पवयीन मुलींचा विनयभंग

घाटकोपर, गोरेगाव व अंधेरीतील घटना; चार गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२४
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – मुंबई शहरात तीन वेगवेगळ्या घटनेत सहा अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार घाटकोपर, गोरेगाव आणि अंधेरी परिसरात उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चार स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. घाटकोपर येथे एकाच वेळेस तीन अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

३४ वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपर परिसरात राहते. तिची बारा वर्षांची मुलगी असून ती त्याच परिसरातील एका शाळेत शिकते. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही मुलगी तिच्या बारा आणि दहा वर्षांच्या दोन मैत्रिणीसोबत ट्यूशनसाठी जात होती. यावेळी याच परिसरात राहणार्‍या आरोपीने या तिन्ही मुलींना थांबवून त्यांच्याशी अश्‍लील चाळे करुन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर त्या तिघीही प्रचंड घाबरल्या. घडलेला प्रकार एका मुलीने तिच्या तक्रारदार आईला सांगितला. या माहितीने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने पंतनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ७९ भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ४५ वर्षांच्या आरोपीस रात्री उशिरा अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी पोक्सो कोर्टात करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने अशाच प्रकारे इतर काही अल्पवयीन मुलींशी अश्‍लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

दुसरी घटना अंधेरी येथे घडली. ३४ वर्षांची तक्रारदार महिला अंधेरी येथे राहत असून पिडीत तिची पंधरा वर्षांची मुलगी आहे. आरोपी याच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. याच संबंधातून त्याने तिचे मोबाईलवरुन काही अश्‍लील फोटो काढले होते. ते फोटो दाखवून तो तिला सतत भेटायला बोलावत होता. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिचे अश्‍लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला होता. या घटनेनंतर तिने आरोपी मुलाविरुद्ध सहार पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध विनयभंगासह आयटी आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेतल्यांनतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

तिसर्‍या घटनेत गोरेगाव येथे एका चौदा वर्षांच्या मुलीचा तिच्याच परिचित तरुणाने पाठलाग करुन तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता गोरेगाव येथील जनरल ए. के वैद्य मार्गावर घडली. मुलीने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी दिडोंशी पोलिसात आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page