शीव हॉस्पिटलच्या २० वर्षांच्या वॉर्डबॉयचा अपघातात मृत्यू
अपघातानंतर टेम्पोचालकाचे घटनास्थळाहून पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका टेम्पोने बाईकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शीव हॉस्पिटलच्या २० वर्षांच्या वॉर्डबॉयचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कांजूरमार्ग परिसरात घडली. सुमीत संतोष यादव असे या वॉर्डबॉयचे नाव असून अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळाहून पलायन केले. याप्रकरणी आरोपी टेम्पोचालकाविरुद्ध कांजूरमार्ग पोलिसांनी हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
हा अपघात बुधवारी दुपारी तीन वाजता कांजूरमार्ग येथील वीर सावरकर रोड, दातार कॉलनीतील आदर्श विद्यालयासमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रोशन संतोष यादव हा तरुण भांडुपच्या टाटानगरच्या सदगुरु सोसायटीमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. तो चालक म्हणून काम करतो तर त्याचा मृत लहान भाऊ सुमीत हा शीव हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून कामाला होता. बुधवारी दुपारी तीन वाजता सुमीत हा त्याचा मित्र रितेश प्रल्हाद इंगले तर रोशन हा त्याचा मित्र यशसोबत दोन बाईकवरुन राहत्या घरातून कांजूरमार्गच्या दिशेने जात होते. ही बाईक आदर्श विद्यालयासमोर येताच एका भरवेगात जाणार्या टेम्पोने सुमीतच्या बाईकला जोरात धडक दिली. यावेळी टेम्पोचा चाक डोक्यावरुन गेल्याने सुमीतला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला इतर तिघांनी तातडीने जवळच्या शीव हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथ त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रोशन यादव याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी टेम्पोचालकाविरुद्ध २७९, ३०१ अ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.