मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिच्यावर ऍसिड हल्ला करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दशरथ अशोक रामाने या ३८ वर्षांच्या आरोपीस भोईवाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह धमकी देणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पालकांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१४ वर्षांची ही मुलगी शिक्षण घेत असून तिच्या पालकांसोबत शिवडी परिसरात राहते. ६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत दशरथ रामाने हा तिचा सतत पाठलाग करुन मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. अनेकदा तो तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २८ ऑगस्टला त्याने तिला पाठलाग करुन तिचा हात पकडून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिच्यावर ऍसिड हल्ल्याची धमकी दिली होती. हा प्रकार मुलीने तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी दशरथ रामानेला पकडून भोईवाडा पोलीस ठाण्यात आले. या मुलीने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ७४, ७८ (२), ३५१ (३) भारतीय न्याय सहिता सहकलम १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपी हा काळाचौकी परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.