मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या २ कोटी ३६ लाखांचा मेडीसनचा अपहार करुन एका महिला केमिस्ट व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार प्रभादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जितेंद्र गुलवाणी आणि वैशाली जितेंद्र गुलवाणी या पती-पत्नीविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
मनिषा प्रशांत चव्हाण ही महिला प्रभादेवी येथे राहत असून तिच्या मालकीचे प्रभादेवीतील साई सुंदर नगर परिसरात एक केमिस्ट शॉप आहे. एप्रिल महिन्यांत तिची गुलवाणी पती-पत्नीशी ओळख झाली होती. या दोघांची त्यांची के के डिस्ट्रीक्युटर नावाची मेडीसनशी संबंधित कंपनी असल्याचे सांगितले. तिचा विश्वास संपादन करुन त्यांनी तिच्याकडे एप्रिल ते जुलै २०२४ या कालावधीत क्रेडिटवर २ कोटी ३६ लाख ८५ हजार ८३७ रुपयांचे मेडीसीन घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत पेमेंट न करता तिची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला. वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून तिला काही प्रतिसाद मिळत नव्हता. या पती-पत्नीकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जितेंद्र व त्याची पत्नी वैशाली गुलवाणी या दोघांविरुद्ध पोलिसांनी ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोघांची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही केमिस्ट व्यावसायिकाची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.