ग्रॅटरोड-नागपाडा येथील कुंटनखान्यातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
कारवाईत महिलेसह दोघांना अटक तर नऊ महिलांची सुटका
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – ग्रॅटरोड आणि नागपाड्यातील कुंटनखान्यात सुरु असलेल्या दोन स्वतंत्र सेक्स रॅकेटचा डी. बी मार्ग आणि नागपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मॅनेजर म्हणून काम करणार्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली असून या कारवाईत नऊ महिलांची सुटका करण्यात आली आहे. मेडीकलनंतर या सर्व महिलांची चेंबूर आणि देवनार येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
विविध राज्यातून मुंबईत आणलेल्या काही तरुणीसह महिलांना कुंटनखान्यात डांबून त्यांना तिथे वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. अशा कुंटनखान्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना ग्रँटरोड येथील कॅनेडी ब्रिज कॉग्रेस हाऊसमधील एका रुमममध्ये कुंटनखाना असून तिथे काही महिलांना जबदस्तीने ग्राहकांसोबत वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती डी. बी मार्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीनतर या पथकाने शुक्रवारी पहाटे पाच वाजता तिथे छापा टाकून रुम क्रमांक अकरामध्ये असलेल्या पाच महिलांची सुटका केली. या महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शबानाबेगम मोहम्मद रफिक शेख या मॅनेजर महिलेस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या पाचही महिलांना नंतर चेंबूरच्या महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.
यापूर्वी नागपाडा पोलिसांनी अशाच एका कुंटनखान्यात छापा टाकून चार महिलांची सुटका केली होती. याप्रकरणी कारु भुवनेश्वर यादव या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. या महिलांना नागपाड्यातील कामाठीपुरा, चौदावी गल्लीतील बंगला क्रमांक आठमध्ये डांबून ठेवून त्यांना तिथे जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते. ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तिथे छापा टाकून कारु यादव याला अटक करुन त्याच्या तावडीतून चार महिलांची सुटका केली. मेडीकलनंतर या चारही महिलांना देवनारच्या नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. कारुविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.