मालाड येथे भरवेगात जाणार्‍या कारने महिलेला फरफरत नेले

महिलेचा मृत्यू तर स्थानिकाकडून कारचालकाला बेदम मारहाण

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – वरळी येथे हिट ऍण्ड रनची घटनेची पुनरावृत्ती मालाड परिसरात घडली. भरवेगात जाणार्‍या एका कारने रस्त्यावरुन जाणार्‍या महिलेला धडक देत तिला काही अंतर फरफरत नेल्याची घटना मंगळवारी रात्री उघडली. या अपघातात सहाना जावेद इक्बाल काझी या २७ वर्षांच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कारचालकाला स्थानिक रहिवाशांनी पकडून बेदम मारहाण करुन कारची तोडफोड केली. मालाड पोलिसांनी हलर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक अनूज सिन्हा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतल लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. वरळीनंतर मालाड परिसरात घडलेल्या या अपघाताने मालाड परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

सहाना ही तिच्या पती आणि दोन मुलांसोबत मालाड येथील ऑरिस टॉवर अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिचा पती महानगरपालिकेत घनकचरा विभागात कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता. सहाना ही काहीच काम करत नव्हती. गेल्या काही दिवसांपासून ती मेहंदी क्लाससाठी जात होती. मंगळवारी सहाना ही नेहमीप्रमाणे मेहंदी क्लाससाठी गेली होती. क्लासवरुन घरी जात असताना तिला भरवेगात जाणार्‍या एका कारने जोरात धडक दिली. यावेळी कारचालकाने कार न थांबविता तिला काही अंतर फरफरत नेले. त्यानंतर कारचालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी कारचालकाचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याला बेदम मारहाण करुन त्याच्या कारची तोडफोड केली. दुसरीकडे अपघाताची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या सहानाला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मारहाणीत जखमी झालेल्या अनूजला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. प्राथमिक औषधोपचारानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अनूज हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असून अपघाताच्या वेळेस तो त्याच्या कारमधून घरी जात होता. भरवेगात कार चालविताना त्याचा कारवरील नियंत्रण सुटले होते. त्यामुळे त्याने सहानाला धडक देत तिला काही अंतर फरफटत नेले होते. त्यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांनी हाणून पाडला. त्याची मेडीकल करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या रिपोर्टनंतरच त्याने मद्यप्राशन केले होते का याचा खुलासा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page