मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२४
मुंबई, – विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांतील एका आरोपी रिक्षचालकास एमएचबी पोलिसांनी नालासोपारा येथून अटक केली. नरेश मोती सिंग असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर शाळेत जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करणार्या एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंधरा वर्षांची ही मुलगी बोरिवली परिसरात राहत असून दहावीत शिकते. शनिवारी ३१ ऑगस्टला सकाळी सव्वासात वाजता ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. रिक्षाने प्रवास करताना रिक्षाचालकाने रिक्षा बंद पडल्याचा बहाणा करुन या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आधी बीएमसी गार्डन आणि नंतर गणपत पाटील नरग टमाटर मार्केटजवळ त्याने तिच्या पायावर, मांडीवर आणि छातीला नकोसा स्पर्श करुन तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तेथून पळून गेली होती. घडलेला प्रकार नंतर तिने तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध ७४ भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपी रिक्षाचालकाच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश एमएचबी पोलिसांना दिले होते. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध सुरु केला होता. या फुटेजवरुन पोलिसांना रिक्षाचा क्रमांक सापडला.
आरोपीच्या राहत्या घरी जाऊन चौकशी केल्यानंतर तो एका गॅरेजमध्ये रिक्षा पार्क करुन चार दिवसांपासून फरार असल्याचे समजले. त्यानंतर तांत्रिक माहितीवरुन तो नालासोपारा येथे लपला असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभोये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर, पोलीस निरीक्षक रविराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, संदीप गोरडे, पोलीस हवालदार प्रविण जोपळे, संदीप परिट, सतीश देवकर, पोलीस शिपाई अर्जुन आहेर, गणेश शेरमाळे यांनी नालासोपारा येथून नरेश सिंग याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. रिक्षाचालक असलेला नरेश हा मूळचा नेपाळचा रहिवाशी आहे. सध्या तो बोरिवलीतील गोराई डेपोजवळील यश यादव चाळीत राहतो. गुन्ह्यांच्या दिवशी त्याने बळीत मुलीशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.