मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – वयोवृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी अंजू किशोर जरीवाला नावाच्या एका वॉण्टेड महिलेस सुरत येथून वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ती पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत तिच्या काही सहकार्यांचे नाव समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बँक खात्याचे ऍप अपडेट करायचे आहे असे सांगून या टोळीने अनेकांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मारिया अंजला डिसुझा ही ७४ वर्षांची वयोवृद्ध महिला वांद्रे येथे राहत असून निवृत्त शिक्षिका आहेत. ९ ऑगस्टला तिला तिच्या मुलाच्या मोबाईलवर एक कॉल आला होता. यावेळी समोरुन बोलणार्या व्यक्तीने तो तिच्या बँकेतून बोलत असून तिच्या बँक खात्याचे ऍप अपडेट करायचे आहे असे सांगून तिच्याकडून तिच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. बँकेचा अधिकारी समजून तिने तिच्या बँक खात्याची माहिती सांगितली होती. काही वेळानंतर तिला तिच्या मोबाईलवरुन बँकेचे मॅसेज आले होते. त्यात तिच्या बँक खात्यात ५ लाख ५३ हजार ८३० रुपये डेबीट झाल्याचे समजले. त्यानंतर काही मिनिटांनी तिला दुसरा मॅसेज आला होता. त्यात तिच्या खात्यातून १ लाख ७१ हजार ५०० रुपये डेबीट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. बँक खात्याची माहिती दिल्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांत अज्ञात सायबर ठगांनी तिच्या खात्यातून ७ लाख २५ हजार ३३० रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगांचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील व अन्य पोलीस पथकाने अंजू जरीवाला या महिलेस संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत अंजू ही मूळची गुजरातच्या सुरतची रहिवाशी आहे. या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस आल्यानंतर तिला पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. अटकेनंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. ऑनलाईन फसवणुक करणारी ही एक टोळी असून ही टोळी ऍपच्या माध्यमातून फसवणुक करते. फसवणुकीचे पैसे ऑनलाईन खरेदी करुन ई वॉलेटद्वारे पेमेंट करते. या टोळीने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातला असून या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. अंजूचे इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.