मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – जोगेश्वरी येथे राहणार्या एका न्युरोसर्जन महिलेच्या घरी सुमारे चौदा लाखांचे सोन्या-हिरेजडीत दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी मुलांचा सांभाळ करणार्या नायरा मिलिता बेग या १८ वर्षांच्या केअरटेकरविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप तिला अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
खुशबू मितेश शेठ ही ३७ वर्षांची महिला न्युरोसर्जन असून जोगेश्वरीतील हिल पार्क, सनमुन अपार्टमेंटमध्ये राहते. तिला तीन लहान मुले असल्याने त्यांचा सांभाळ करण्यासाठी तिने अस्मिता आणि नायरा या दोघींना केअरटेकर म्हणून कामाला ठेवले होते. दिवसभर काम करुन त्या दोघीही त्यांच्याच घरी राहत होत्या. १० सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता ती तिच्या मुलांसोबत बाहेर फिरायला गेली होती. काही वेळानंतर ती घरी आली. यावेळी तिला नायरा ही एक बॅग घेऊन घराबाहेर जाताना दिसली. काही वेळानंतर ती घरी परत आली होती. याच दरम्यान खुशबूला तिच्या भावाचा कॉल आला होता. त्याने तिला त्याच्या घरी बोलाविले होते. त्यामुळे ती भावाकडे जाण्यासाठी निघाली होती. यावेळी तिने कपाटातील ज्वेलरीचा बॉक्स उघडला असता तिला बॉक्समधील एक ब्रेसलेट, दोन हिरेजडीत रिंग, सोन्याची चैन, पेडंट आदी दागिने दिसून आले नाही. त्यामुळे तिने कपाटातील इतर दागिन्यांची पाहणी केली होती. यावेळी तिला सुमारे चौदा लाखांचे सोन्याचे तसेच हिरेजडीत दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले होते.
या घटनेनंतर तिने नायराकडे चौकशी केली होती, मात्र तिने दागिन्यांच्या चोरीबाबत तिला काहीच नसल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर तिने ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दागिन्यांची चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीत तिने नायरा बेग हिच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे तिच्याविरुद्ध पोलिसांविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नायराची पोलिसाकडून लवकरच चौकशी होणार आहे.