बाईकच्या डिक्कीत ठेवलेली सव्वाबारा लाखांची कॅश चोरट्यांनी पळविली
पुजार्याच्या तक्रारीवरुन काही तासांत तिन्ही आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – फ्लॅट खरेदीसाठी एका ४२ वर्षांच्या पुजार्याने बाईकच्या डिक्कीत ठेवलेली सुमारे सव्वाबारा लाखांची कॅश अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी सायंकाळी पळवून नेल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच कांदिवली पोलिसांनी अवघ्या काही तासांत रॉबरीच्या गुन्ह्यांची उकल करुन पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. बरकतउल्ला शोएब खान, राजेश सुरेंद्र सिंग आणि मोहम्मद अख्तर मोहम्मद रमजान हुसैन अशी या तिघांची नावे असून ते तिघेही कांदिवलीतील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी साडेसहा लाखांची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून उर्वरित कॅश लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी सांगितले.
मोहनराज लल्लाराम मिश्रा हे मालाडच्या मालवणी, जुलेशवाडी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते पूजापाठ विधी करत असून मालवणीतील शिव मंदिरातील पुजारी म्हणून काम करतात. जानेवारी २०२४ रोजी त्यांची हुसैन अख्तर आणि बिट्टू खान यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनीही त्यांना बिल्डरच्या ओळखीतून कांदिवलीतील एसआरए इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांना एसआरएचा एक फ्लॅट असून तो ३५ लाखांपर्यंत देतो असे सांगून त्यांना कांदिवली येथे बोलावून घेतले होते. याच फ्लॅटच्या चर्चेसाठी मंगळवारी २७ फेब्रुवारीला दुपारी दिड वाजता ते कांदिवली येथे आले होते. यावेळी त्यांनी त्यांची बाईक गरुडा बारसमोर पार्क केली होती. या दोघांची भेट घेतल्यानंतर त्यांनी फ्लॅटची किंमत जास्त असून आपण २५ लाख रुपये देऊ शकतो असे सांगितले. त्यापैकी त्यांना पंधरा लाख कॅश तर दहा लाख चेक स्वरुपात देण्याचे मान्य केले. तसेच पैशांसाठी काही दिवसांची अवधी मागवून घेतली होती. काही वेळानंतर ते डिक्कीत ठेवलेले १२ लाख ३० हजार रुपये घेण्यासाठी गेले होते. मात्र बाईकच्या डिक्कीत पैसे नव्हते. अज्ञात चोरट्याने डिक्कीतील कॅश चोरी करुन पलायन केले होते. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला.
या घटनेची ज्ञानेश्वर गणोरे यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी मोहनराज मिश्रा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा नोंदविला होता. हा गुन्हा दिवसाढवळ्या आणि गजबलेल्या परिसरात घडल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहम कदम, पोलीस उपनिरीक्षक दिपक पाटील, पोलीस शिपाई नवलू, स्वप्नील जोगलपुरे, प्रविण वैराळ, गवळी यांनी बरकतउल्ला खान, राजेश सिंग आणि मोहम्मद अख्तर हुसैन या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चोकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला. तपासात राजेशने त्यांच्या बाईकच्या डिक्कीतील कॅश चोरी करुन बरकतउल्ला आणि मोहम्मद अख्तरला ती कॅश दिली होती. त्यानंतर या तिघांनी ही रक्कम आपसांत वाटून घेऊन तेथून पलायन केले होते. चोरीची साडेसहा लाखांची कॅश बरकतअलीकडून पोलिसांनी जप्त केली आहे.
या कबुलीनंतर तिन्ही आरोपींना पोलिसांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यांतील उर्वरित रक्कम लवकरच हस्तगत केली जाणार आहे. या चोरीमागे त्यांच्यासह इतर काही आरोपींचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. रॉबरीचा गुन्हा नोंद होताच अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना चोरीच्या साडेसहा लाखांच्या कॅशसहीत अटक करणार्या कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे व त्यांच्या पथकाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी कौतुक केले.