जोगेश्वरीतील वयोवृद्ध व्यावसायिकाची ३.६१ कोटीची ऑनलाईन फसवणुक
कापड व्यावसायिकाला अटक तर २ कोटी २१ लाखांची कॅश गोठविण्यात यश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका ७३ वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाची ३ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी केताबअली काबिल बिस्वास या आरोपी ठगाला पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. केताबअली हा कापड व्यावसायिक असून त्यानेच त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीची ही रक्कम ३३० हून अधिक बँक खात्यात वळविण्यात आले होते, संबंधित सर्व बँक खात्यातील २ कोटी २१ लाखांची रक्कम गोठविण्यात सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर केताबअलीला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून अशा प्रकारे फसवणुक करणारी ही टोळी कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या इतर सहकार्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
फकरुद्दीन युसूफ बगसरावाला हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत जोगेश्वरीतील नटवर नगर रोड क्रमांक पाच, आनंद अपार्टमेंटमध्ये राहतात. गेल्या वर्षी त्यांना कला ऑनचिरा नावाच्या एका महिलेचा कॉल आला होता. तिने त्यांना एक आकर्ष गुंतवणुक योजना सांगून या योजनेत गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगतले होते. त्यानंतर स्टेला आणि पॉल ट्युडेार नावाच्या दोन व्यक्तींनी त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करुन घेतले होते. त्यांना विविध योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यासाठी त्यांच्यासोबत एक बोगस करार करुन कराराची एक प्रत ऑनलाईन पाठविण्यात आली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून फकरुद्दीन बगसरावाला यांनी मे ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत विविध योजनेत ३ कोटी ६१ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यांची गुंतवणुक रक्कमेवर त्यांना चांगला फायदा होत आहे असे सांगून त्यांना रक्कम फुगवून व्हॉटअपच्या सिल्व्हर ग्रुपवर दाखविण्यात आली होती. मात्र दिलेल्या मुदतीत परताव्यासह मुद्दल रक्कम परत केली नाही. वारंवार विनंती करुनही त्यांनी त्यांचे पैसे दिले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६७, ४७१, १२० (ब), ३४ भादवी सहकलम ६६ (क), ६६ (ड) आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे यांनी सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक तायडे, पोलीस शिपाई दिपक पडळकर, अभिजीत देसाई, विजय जाधव यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी केताबअली बिस्वास याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत केताबअली हा सांताक्रुज येथील प्रभात कॉलनी, गोपीनाथ चाळीत राहत असून त्याचा स्वतचा कपड्यचा कारखाना आहे. त्यानेच त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासात फसवणुकीची काही रक्कम केताबअलीच्या दोन बँक खात्यात जमा झाली होती. त्यानंतर त्याने ती रक्कम विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. काही दिवसांत सुमारे ३३० हून अधिक बँक खात्यात ही रक्कम वळविण्यात आली होती. त्यामुळे सायबर सेल पोलिसांनी संबंधित सर्व बँक खात्याची माहिती काढून बॅकेच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून सर्व बँक खाती गोठविण्याची विनंती केली होती. या बँक खात्यांसह खात्यातील २ कोटी २१ लाख रुपयांची कॅश गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. केताबअलीच्या चौकशीतून त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांचा आता पोलीस शोध घेत आहे.
मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेमार्फत वयोवृद्धासहसर्वसमान्य नागरिकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगापासून सावध राहावे, साोशल मिडीयाद्वारे प्राप्त होणार्या जाहिराती पाहून शेअर मार्केटसह कमोंडिटी एक्सचेंजमध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी आधी त्याची शहानिशा करा. अशा पॉन्झी स्किममध्ये गुंतवणुक करु नका. मोबाईलवर कुठल्याही अज्ञात व्यक्तीसोबत आपल्या बँक खात्यासह पासवर्ड, केवायसी, डेबीट, के्रडिट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड क्रमांक शेअर करु नका. अशा प्रकारे कोणीही माहिती मागत असल्यास त्याची स्थानिक पोलिसांत तक्रार करा. मोबाईलवर येणार्या कुठल्याही ऍपची लिंक डाऊनलोड करु नका किंवा ती लिंक क्लिक करु नका. तसेच ऑनलाईन फसवणुक झाल्यास सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साघावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.