मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – पंधरा वर्षांच्या स्वतच्याच अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पित्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मुलीवर अत्याचार केल्याचा जाब विचारला म्हणून आरोपीने त्याच्याच पत्नीला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली, तसेच तिच्यासह मुलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
१५ वर्षांची बळीत मुलगी मालाडच्या मढ-मार्वे रोडवर तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून सध्या शिक्षण घेते. ३८ वर्षांचा आरोपी तिचा पिता असून त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. शनिवारी २१ सप्टेंबरला दुपारी दिड वाजता ती खाजगी क्लासवरुन घरी आली होती. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या तिच्या पित्याने तिला मिठी मारुन तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याने तिच्या टॉपमध्ये हात घालून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने आरोपीस जाब विचारण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने तिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. तसेच तिच्यासह मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र असा प्रसंग पुन्हा होण्याची शक्यता असल्याने तिने शुक्रवारी मुलीसोबत मालवणी पोलीस ठाणे गाठले आणि तिथे बळीत मुलीने उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या पित्याविरुद्ध ३५१ (२), ११५ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत आरोपी पित्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. बळीत मुलीची पोलिसांकडून मेडीकल करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. आरोपीला दारु पिण्याचे व्यसन असून हा प्रकार दारुच्या नशेत घडल्याचे पोलिसांनी सांगितले.