मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका शेअरमार्केट ट्रेडिंग करणार्या व्यावसायिकाची सुमारे पाच लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी दिपेशकुमार विठ्ठलभाई कुंभानी या ३५ वर्षांच्या आरोपीस मलबार हिल पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दिपेशकुमार हा सुरतच्या एनआर आरोग्य केंद्रासमोरील विशालनगर, सहजानंद सोसायटीचा रहिवाशी असून या कटात त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या आरोपींनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
४९ वर्षाचे निरव दिनेश शहा हे मलबार हिल परिसरात राहत असून त्यांचा शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. २० जुलैला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो मुंबई उच्च न्यायालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचा आधारकार्डचा गैरवापर झाला असून त्यांच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांसह कोर्ट नोटीस क्रमांक देऊन त्यांना पोलीस अधिकारी सचिन पाटील यांच्याशी बोलण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याने त्यांचा कॉल सचिन पाटीलशी ट्रान्स्फर केला होता. यावेळी त्याने त्यांच्या आधारकार्डवरुन अंधेरीतील एका बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात २५ लाखांची कॅश जमा झाली आहे. या कॅशबाबत त्यांच्याकडे विचारण्यात आली होती. यावेळी निरव शहा यांनी त्यांचा या बँक खात्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना सचिन पाटीलने मुंबईत प्रचंड पाऊस पडत आहे, त्यामुळे तुम्ही ऑनलाईन तक्रार करा असे सल्ला देताना त्यांना एक ऍप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांनी ते ऍप डाऊनलोड केले.
यावेळी सचिन पाटील नाव सांगणार्या व्यक्तीने त्यांची व्हिडीओ कॉलवरुन चौकशी सुरु केली होती. त्यांचा कुठला व्यवसाय आहे, घरात किती सभासद आहे. त्यांचे कुठल्या बँकेत किती खाती आहे असे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांच्या खात्यातून २५ लाख रुपये ट्रान्स्फर झाले आहेत, त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा. जी माहिती असेल तर पोलिसांशी शेअर करा. नाहीतर एका तासांत त्यांच्या घरी पोलीस येतील आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल अशी भीती घालण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी त्याला अपेक्षित असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती.
चौकशीदरम्यान त्यांच्या बँक खात्यात पाच लाख पाच हजार रुपये शिल्लक होते. त्यामुळे त्याने त्यांना एक बँक खाते देऊन त्यांना पाच लाख रुपये तातडीने ट्रान्स्फर करा. चौकशीनंतर ही रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कुठलीही शहानिशा केल्यानंतर संबंधित बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर त्यांना सचिन पाटीलने संपर्क साधला नाही. त्यांनी त्याला मॅसेज पाठविले, मात्र त्याचा कुठलाही रिप्लाय आला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मलबार हिल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासात पाच लाखांची ही रक्कम आसामच्या एका खाजगी बँकेत आणि नंतर काही रक्कम सुरतच्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती.
या बँक खात्याची माहिती काढताना पोलिसांना दिपेशकुमारची माहिती समजली होती. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अनिल वायाळ, पोलीस शिपाई संदे, धारवाडकर या विशेष पथकाने सुरत येथून दिपेशकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची २ लाख २४ हजार २५० रुपयांची कॅश ट्रान्स्फर झाली होती. दिपेशकुमारने फसवणुकीसाठी सायबर ठगांना त्याच्या बँक खात्याची माहिती पुरविली होती. फसवणुकीची रक्कम सायबर ठगांना पाठविल्यानंतर त्याला ठरविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते.