गोरेगाव मेट्रो स्थानकातील आत्महत्येच्या पहिल्या एडीआरची नोंद
२५ वर्षांच्या तरुणाने ग्रिलवरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – गोरेगाव मेट्रो स्थानकात सोमवारी सायंकाळी आत्महत्येच्या पहिल्या गुन्ह्यांची नोंद झाली. एका २५ वर्षांच्या तरुणाने गोरेगाव मेट्रो स्थानकाच्या ग्रिलवरुन उडी घेऊन आत्महत्या करुन जीवन संपविले. या तरुणाकडे कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे.
मृत तरुण हा त्याच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव येथील शहिद भगतसिंग नगरात राहत होता. तो काहीच कामधंदा करत नव्हता. त्याला ड्रग्जचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. सोमवारी सायंकाळी तो गोरेगाव मेट्रो स्थानकात आला होता. त्याने मेट्रोचे तिकिट काढले आणि तो फलाटावर गेला होता. काही वेळ तिथे थांबल्यानंतर तो ग्रिलवर चढला आणि त्याने उडी घेतली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती प्राप्त होताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या आई-वडिलांना देण्यात आली होती. त्याच्याकडे कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. याप्रकरणी त्याच्या पालकासह नातेवाईकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या आत्महत्येला त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. मेट्रो स्थानकात झालेल्या आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे.