मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – कांदिवली आणि अंधेरी येथे आठ आणि पंधरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंधेरी आणि चारकोप पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत एका २४ वर्षांच्या आरोपीस अंधेरी पोलिसांनी अटक केली तर नातेवाईक असलेल्या दुसर्या आरोपीचा चारकोप पोलीस शोध घेत आहेत.
३५ वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या आठ वर्षांच्या मुलीसोबत गेल्या पंधरा वर्षांपासून तिच्या मोठ्या बहिणीसोबत राहते. २४ वर्षांचा आरोपी तिच्या मोठ्या बहिणीचा लहान मुलगा आहे. २७ सप्टेंबरला ही मुलगी घरात झोपली होती. यावेळी त्याने तिला उचलून किचनमध्ये आणले. तिथेच त्याने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार मोठ्या बहिणीच्या दुसर्या मुलाला समजताच त्याने मुलीची चौकशी केली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने चारकोप पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत त्याला अटक झाली नसून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसर्या घटनेत अन्य एका पंधरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार अंधेरी येथे उघडकीस आला आहे. ही मुलगी अंधेरी येथे राहत असून २४ वर्षांचा आरोपी तिचा परिचित आहे. सोमवारी रात्री पावणेदहा वाजता त्याने तिला त्याच्या घरी बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिला तिचे सर्व लफडे माहित असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला बेडरुममध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. घडलेला प्रकार तिने अंधेरी पोलिसांना सांगितला. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.