मुंबई-बंगलोर विमानात बॉम्ब असल्याच्या कॉलमुळे खळबळ
धमकीचा कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – मुंबईहून बंगलोरला जाणार्या विमानात बॉम्ब असल्याचा अकासा एअरलाईन्स मालाडच्या कॉल सेंटरला आलेल्या कॉलनंतर विमान कर्मचार्यासह प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण विमानाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ते विमान रात्री उशिरा बंगलोरसाठी रवाना करण्यात आले होते. विमानात काहीच आक्षेपार्ह वस्तू न सापडल्योन कंपनीच्या अधिकार्यांसह प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान धमकीचा कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरुन हा कॉल आला होता, त्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
निलेश यशवंत घोंगडे हे विलेपार्ले येथील तेजपाल रोड, ओल्ड अशोककुंजमध्ये राहतात. ऑक्टोंबर २०२२ पासून ते अकासा एअरलाईन्समध्ये सिक्युरिटी मॅनेजर म्हणून कामाला आहेत. सध्या त्यांची नेमणूक डोमेस्टिक एअरपोर्टवर आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. यावेळी त्यांना लोअर परेल येथील सिक्युरिटी अधिकारी निलेश मधुवार यांनी कॉल करुन त्यांच्या मालाड येथील कॉल सेंटरला एका अज्ञात व्यक्तीने दुपारी दिड वाजता मुंबईहून बंगलोरला विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी या विमानाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना फ्लाईंटमध्ये १६७ प्रवाशी असून सध्या ते विमान अल्फा एक येथे लॅडिंगसाठी सज्ज असल्याचे समजले धमकीच्या कॉलनंतर त्यांनी एअरपोर्ट पोलिसांना ही माहिती दिली.
या माहितीनंतर एअरपोर्ट पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरुन नंतर संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या बॅगेची बॉम्बशोधक पथकाने श्वान पथकासोबत तपासणी केली होती. मात्र विमानात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. विमानात बॉम्ब असल्याच्या कॉल आल्यानंतर सर्व प्रवाशांना एअर इंडिया हँगरसमोरील इको ९ या ठिकाणी आयसोलेटेड करण्यत आले होते. बॉम्बच्या माहितीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व क्लिअर असल्याचे उघड होताच संबंधित एअरलाईन्स अधिकार्यासह प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यानंतर सर्व प्रवाशांना पुन्हा विमानात बसण्यास सांगण्यात आले.
रात्री दिड वाजता विमानाला बंगलोर येथे जाण्यास हिरवा कंदिल देण्यात आला होता. या घटनेनंतर निलेश घोंगडे यांनी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात बॉम्ब असल्याचा कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपी कॉलरविरुद्ध ५०५ (१), (ब), ५०६ (२), ५०७ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा एअरपोर्ट पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. आरोपीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढण्याचे काम सुरु असून लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.