पंधरा लाखांचे विविध दागिने घेऊन नोकराचे पलायन

व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन नोकराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सुमारे पंधरा लाख रुपयांचे सोने, चांदी आणि हिरेजडीत दागिने घेऊन नोकराने पलायन केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. पळून गेलेल्या नोकराविरुद्ध मालाड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु आहे. नितीशकुमार असे या नोकराचे नाव असून तो मूळचा बिहारच्या मधुबनी, फिरोजगढचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेसाठी मालाड पोलिसांची एक टिम लवकरच बिहारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनन कमल पोदार हे मलाडच्या मार्वे रोड, शांतीसदन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची लिपीन एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून ही कंपनी अबे्रसिव्ह पावडर तयार करते. कामानिमित्त ते त्यांच्या वडिलांसोबत दिवसभर बाहेर असतात तर त्यांची आई घरी असते. त्यामुळे तिची देखभाल तसेच मदतीसाठी त्यांनी नितीशकुमारला त्यांच्याकडे घरगडी म्हणून कामाला ठेवले होते. जुलै २०२३ पासून तो त्यांच्याकडे कामाला असून दिवसभर काम करुन तो किचनमध्ये झोपत होता. चार महिने काम केल्यानंतर तो नोव्हेंबर २०२३ रोजी काम सोडून त्याच्या बिहार येथील गावी निघून गेला होता. त्यानंतर त्यांनी रामवतार नावाच्या एका व्यक्तीला कामावर ठेवले होते. १ जुन २०२४ रोजी नितीशकुमार हा त्यांच्या घरी आला आणि त्याने त्यांना पुन्हा कामावर ठेवण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला पुन्हा कामावर ठेवले होते. ३० जुलैला नितीशकुमार हा त्यांच्या घरातून अचानक कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. दोन दिवस प्रयत्न करुनही त्याचा मोबाईल बंद येत होता. तो पुन्हा नोकरी सोडून निघून गेला असावा असा विचा करुन त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

४ ऑक्टोंबर २०२४ रोजी त्यांनी कपाटातील लॉकर उघडले होते. यावेळी त्यांना लॉकरमधील १५ लाख ३० हजार रुपयांचे विविध सोने-चांदी आणि हिरेजडीत दागिने दिसून आले नाही. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना दागिन्यांविषयी विचारणा केली, मात्र त्यांना दागिन्यांबाबत काहीही माहित नव्हते. त्यांनी घरासह कपाटात सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेच दागिने सापडले नाही. या कालावधीत त्यांच्या घरी रामवतार आणि नितीशकुमार वळगता कोणीही आले नव्हते. त्यात नितीशकुमार हा अचानक नोकरी सोडून निघून गेला होता. त्यानेच ही चोरी करुन कोणालाही काहीही न सांगता पलायन केले असावे असा संशय व्यक्त करुन त्यांनी घडलेला प्रकार मालाड पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नितीशकुमारविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. नितीशकुमार त्याच्या बिहार येथील गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच बिहारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page